सांगली : राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसान भरपाईसाठी 41 हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त शासनाकडून अजूनही उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2024-25 अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत पलूस तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटींच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. पलूस तालुक्यातील औदुंबर येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी चोपडेवाडी, संतगांव (राडेवाडी), बुर्ली, दह्यारी, तुपारी, नागठाणे, सुखवाडी व अंकलखोप या गावांसाठी प्राप्त फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, गटविकास अधिकारी राजेश कदम, महेंद्र लाड, सम्राट महाडिक, राजाराम गरूड विविध गावचे सरपंच आदि उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आपत्तीबाबत पुढचे भविष्य कुणाला सांगता येत नाही, पण सतर्क असणे गरजेचे आहे. पलूस तालुक्यात आवश्यक उर्वरित आणखी यांत्रिक बोटी लवकरच देण्यात येतील. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पूर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. दूरदृष्टी ठेऊन नदीकाठापासून दूर जिथे पूराचे पाणी येणार नाही अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. जागतिक बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून पुराचे पाणी पाईपलाईनने दुष्काळी भागात मराठवाड्यात देण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार विशाल पाटील म्हणाले, आपत्कालिन परिस्थितीत यांत्रिक बोटींच्या माध्यमातून सर्वांच्या परिवाराला संकट काळात सुखरूप ठेवण्याचे काम होईल असे सांगून त्यांनी 2019 च्या पुराबाबत सविस्तर कथन करताना आलेल्या अडीअडचणी मांडल्या.आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, महापुरात आलेले संकट कृष्णाकाठच्या लोकांनी अनुभवले आहे. सन 2019 च्या महापुरात संकट काळात शासनाबरोबरच भारती विद्यापीठाच्या माध्यमातूनही पूरग्रस्तांना मदत, आरोग्य व स्वच्छतेबाबत कार्य केले. श्री क्षेत्र औदुंबर येथे भाविकांची गर्दी वाढत असून सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. येथे झुलता पूल, विस्तारित घाट होणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी वासुदेव जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक घनश्याम सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. आभार सचिनन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास औदुंबर, अंकलखोप व परिसरातील गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.