अहिल्यानगर : “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ – २६” अंतर्गत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली.या योजनेचा उद्देश ग्रामीण व वंचित समाजघटकांच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधा सुधारणे, नागरिकांना आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.
या मंजूर रु. १ कोटी निधीतून कर्जत तालुक्यासाठी ५९ लाख रुपये आणि जामखेड तालुक्यासाठी ४१ लाख रुपये असा निधी विभागला गेला असून, या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अंतर्गत तांडा, वाडी व वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक्स बसविणे, सौरप्रकाश दिव्यांची व्यवस्था, वीजपुरवठा, बसस्टॉप उभारणी आणि अन्य सार्वजनिक सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
कर्जत तालुक्यातील दुरगाव (गावठाण वस्ती) येथे सौरप्रकाश दिवे बसविणे (₹५.०० लाख), जलालपूर (सटवाई वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख), कुळधरण (वडार वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख), मिरजगाव ( वडार वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख), पिंपळवाडी (देवकाते वस्ती) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख), तळवडी ताजु ( कडेकर वस्ती ) येथील रस्ता काँक्रीटीकरण (₹७.०० लाख), चिंचोली काळदात ( व्हटकरवाडी ) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (₹७.०० लाख), कोरेगाव (सटवाई वाडी) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे. (₹७.०० लाख), रेहेकुरी येथील चुनखडी वस्तीसाठी वीजपुरवठा करणे (₹५.०० लाख) या नऊ विकासकामांसाठी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तर जामखेड तालुक्यातील आनंदवाडी (गावठाण वस्ती) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (₹८.०० लाख), मोहा (बांगरवस्ती) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (₹५.०० लाख), सारोळा (हुलगुंडे वस्ती) येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (₹८.०० लाख), फक्राबाद (जायभाय वस्ती) येथे सौरप्रकाश दिवे बसविणे (₹५.०० लाख), नाहुली (गर्जे वस्ती) येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (₹८.०० लाख), खर्डा (वडारवाडा) येथे बंदिस्त गटार करणे ( ₹७.०० लाख) या सहा विकासकामांसाठी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भात विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले की, तांडा आणि वस्त्यांचा विकास म्हणजे समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याची संधी देणे. शासनाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी दिलेला हा निधी ग्रामीण विकासासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी दर्जेदार, पारदर्शक आणि जनाभिमुख पद्धतीने करण्यात यावी.
सभापती प्रा.शिंदे यांनी या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की, ही योजना तांडा आणि वस्त्यांमधील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल. मूलभूत सुविधा निर्माण होऊन सामाजिक न्याय आणि समान संधीची भावना अधिक दृढ होईल.
या योजनेच्या अंमलबजावणीनंतर कर्जत – जामखेड तालुक्यातील या १५ गावांमध्ये तांडा व वस्त्यांमधील रस्ते, वीज, पाणी आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुधारतील. नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि ग्रामीण भागातील वंचित समाजघटकांचा आत्मविश्वास वाढेल. शासनाच्या या निर्णयामुळे मतदारसंघात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.