मुंबई : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची प्रमुख भूमिका असलेला मनाचे श्लोक हा चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. याचे नाव बदलून 'तू बोल ना' असे करण्यात आले आहे. पुण्यात काही धार्मिक संघटनांनी 10 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला त्या दिवशी बंद पाडला होता. चित्रपटाच्या नावाला विरोध करत चित्रपटाचे शो बंद पाडले होते. मनाचे श्लोक हा चित्रपट आता 'तू बोल ना' या नव्या नावासह प्रदर्शित होत आहे 16 ऑक्टोबर रोजी गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट अखेर नाव बदलल्यानंतर नव्या नावासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संत रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोक’ या ग्रंथाशी संबंधित पवित्र शब्दाचा चित्रपटाच्या शीर्षकासाठी वापर केल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा आरोप काही धार्मिक संघटनांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर पुण्यातील अनेक चित्रपटगृहांत काही हिंदुत्ववादी संघटनांनी शो बंद पाडले. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, जोपर्यंत चित्रपटाचे नाव बदलले जात नाही, तोपर्यंत प्रदर्शन होऊ देणार नाही. या वादानंतर चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत आले होते.
दरम्यान, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या या विरोधानंतर निर्मात्यांनी वाद शांत करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत, कलाकार आणि निर्मात्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.
मराठी चित्रपट 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या शीर्षकाचे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य आहे, त्याचा श्री समर्थ रामदास स्वामींशी काहीही संबंध नाही, असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयानं गुरुवारी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता. यासंदर्भातील निकाल देताना न्या संदेश पाटील यांनी जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, हा समर्थ रामदास स्वामींचा 'मनाचे श्लोक'मधील एक श्लोक म्हणून दाखवला होता.
शेवटी, चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात आले असून नव्या नावासह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आता या नव्या नावाखालील चित्रपटाला कितपत प्रतिसाद देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.