मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे सध्या स्वीडन दौऱ्यावर असून, राज्याच्या मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी ते बैठक घेत आहेत.या दौऱ्यादरम्यान मंत्री राणे यांनी स्वीडनमधील नामांकित सागरी तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांशी गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगार निर्मिती यासंबंधी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
मंत्री राणे यांनी सागरी बॅटरी निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, ‘इचान्डीया (Echandia)’ आणि आधुनिक पुरवठा साखळी व स्वयंचलित वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी संस्था ‘इनराईड (Einride)’ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या कंपन्यांसोबत राज्यात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘ग्रीन इंडस्ट्रीज’ धोरणांतर्गत या कंपन्यांना सर्व आवश्यक सुविधा देण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी या कंपन्यांना महाराष्ट्रात उत्पादन युनिट्स व तंत्रज्ञान केंद्रे उभारण्यासाठी आमंत्रणही दिले.
या बैठकांमुळे राज्यात नवीन रोजगार निर्मिती, हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. स्वीडनमधील मेरीटाईम क्षेत्रात महाराष्ट्राबाबत उत्सुकता वाढली असून, या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि युरोपीय सागरी उद्योगांमध्ये नव्या सहकार्याच्या दिशा खुल्या होतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.या दौऱ्यात अंबर अयाडे, ग्रामीण एन्हान्सर्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एफडीआयचे सदस्य उपस्थित होते.