सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
  • एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 DIGITAL PUNE NEWS

फलटण प्रकरणातला ‘बनकर’ अटकेत ; कुटुंबियांचा नवा गौप्यस्फोट;आरोपी पोलिसाच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा

डिजिटल पुणे    25-10-2025 15:44:04

फलटण : फलटण (जि. सातारा) येथे उपजिल्हा रुग्णालयातील सेवेत असलेल्या महिला डॉक्टरने एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि स्थानिक राजकारण्यांवर गंभीर आरोप होत असून, या आत्महत्येच्या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहेत.

साताऱ्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून, आज त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. आरोपीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केले होते, पण त्याने ते नाकारले होते. डॉक्टर मॅडम नेहमी तणावात असायच्या, असेही तिने सांगितले. प्रशांतने स्वतः पोलिसांना शरण आल्याचेही तिने स्पष्ट केले. नातेवाईकांनी घटनेच्या सखोल तपासाची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये काही व्यक्तींची नावे होती. या चिठ्ठीत उल्लेख असलेल्या प्रशांत बनकर या तरुणाला पोलिसांनी त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवरून आज पहाटे अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी पीएसआय गोपाल बदने अजूनही फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.

गोपाल बदने हा मूळचा परळी (जि. बीड) येथील असून त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर परिसरात आढळल्याचे तपासातून समोर आले आहे. मात्र त्यानंतर तो कुठे गेला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. सातारा पोलिसांच्या दोन विशेष पथकांनी बदनेच्या शोधासाठी मोहीम राबवली असून लवकरच तो ताब्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांनी मात्र आपल्या मुलाचे नाव या प्रकरणात अन्यायाने गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. बनकरचे आई-वडील म्हणाले, “आमचा मुलगा पुण्यात नोकरीसाठी राहतो. तो फक्त दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी आला होता. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्या मॅडमनी मुद्दाम त्याचे नाव लिहिले आहे. तिने आमच्यावर अन्याय केला आहे.”

बनकरच्या वडिलांनी सांगितले की, “आम्ही त्या डॉक्टरांना मुलीसारखे वागवले. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग झाली होती. तिच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. तिने कोणाच्या दबावाखाली हे पाऊल उचलले का, याची शासनाने चौकशी करावी.”

या घटनेनंतर सातारा पोलिसांवर आणि आरोग्य खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आत्महत्या करणारी डॉक्टर ही आपल्या कार्यकाळात सक्रिय आणि जबाबदार म्हणून ओळखली जात होती. मात्र, तिच्या या टोकाच्या निर्णयामागे नेमके कोणते मानसिक, सामाजिक किंवा व्यावसायिक कारण होते, याचा तपास सध्या सुरू आहे.

स्थानिक स्तरावर राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. महिला डॉक्टरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागील पार्श्वभूमी उघड होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे फरार असलेला पीएसआय गोपाल बदने लवकरच पोलिसांच्या तावडीत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून, आत्महत्येच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी नागरिक, आरोग्य अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी सखोल तपासाची मागणी केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती