चंद्रपूर : यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 94098 शेतकऱ्यांना 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपयांचे वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली. तसेच ज्या शेतक-यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे निधी पोहचला नाही, अशा शेतक-यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1 लक्ष 10 हजार 665 हेक्टर जमीन बाधित झाली. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 लक्ष 26 हजार 286 आहे. यासाठी राज्य शासनाकडून 94 कोटी 86 लक्ष 27 हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 94 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपये जमा केले आहे.
यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 12 हजार 882 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 कोटी 84 लक्ष 75 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील बाधित 12 हजार 297 शेतकऱ्यांना 9 कोटी 42 लक्ष 46 हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्यातील बाधित 68 हजार 919 शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 16 लक्ष 6 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला आमदार करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, सहायक जिल्हाधिकारी बालाजी कदम, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.
रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी : अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध शेती पिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शासनाकडे निधी मागणी करण्यात आली आहे. यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 13 हजार 742 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 62 लक्ष 10 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीबाधित 15 हजार 384 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 4 लक्ष 67 हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित 96 हजार 477 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 64 लक्ष 14 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी सवलती जाहीर : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाकरीता वसुलीस स्थगिती, तिमाही वीजबिलात माफी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी यांचा समावेश आहे
शासनाकडून प्राप्त झालेला अतिवृष्टीग्रस्त मदतनिधी त्वरित वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली नाही. यात प्रामुख्याने सामुहिक खाते असलेल्या खातेदारांचे संमती पत्र न मिळणे, ई -केवायसी प्रलंबित असणे, आधार अपडेट व बँक खाते संलग्न नसणे याचा समावेश आहे. तरी सामुहिक खातेदारांनी संबंधित तलाठ्याकडे त्वरित संमतीपत्र सादर करावे. मदतनिधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच तलाठ्यांशी संपर्क करून ई -केवायसी करून घ्यावी. तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावे. जेणेकरून शेतक-यांच्या खात्यात मदत निधी जमा करता येईल.