पुणे :  राज्य शासनाच्या एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ही ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रयोगशाळेतील अत्याधुनिक सुविधा, उपकरणे आणि चालू कामकाजाचा आढावा घेतला. या प्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. एम. डी. धुम यांनी एम.आय.व्ही. प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती, तपासणी प्रक्रिया आणि राज्यभरातील प्रयोगशाळा नेटवर्कविषयी सविस्तर माहिती दिली.
श्री. आबिटकर यांनी प्रयोगशाळेतील वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून संशोधन, निदान आणि प्रयोगशाळा व्यवस्थापन क्षेत्रात अधिक दर्जेदार काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “राज्यातील एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ही रोगनिदान क्षेत्रात आदर्श ठराव्यात आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारे केंद्र बनावे, हेच आपले उद्दिष्ट आहे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.