उरण : उरण मध्ये अनेक विविध समस्या, प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जे उपाय योजना करणे गरजेचे आहेत ते होताना दिसून येत नाही. उरणला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. या विविध समस्या वर महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी आवाज उठविला आहे.
महिला सुरक्षिततेच्या संदर्भात महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री शरदचंद्र पवार पक्ष )चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावना घाणेकर यांनी उरण मधील विविध समस्या संदर्भात पोलीस प्रशासनाचे नवी मुंबई परिमंडळ २ चे उपायुक्त अमित काळे यांची भेट घेतली.चर्चेदरम्यान उरण मधील अति संवेदनशील बाबींवर त्यांचे लक्ष वेधले तसेच उरण मध्ये आजही अनेक सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, रस्त्यांवर दिवे नाहीत, उरण मध्ये झालेली यशश्नी शिंदे यांची हत्या त्याठिकाणी देखील आजसुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे आणि दिवे नाहीत तसेच उरण रेल्वे स्थानकापासून पुढे शहराकडे येणारा रस्ता देखील नेहमी अंधारमय झालेला असतो.अनेक महिला भगिनी येत जात असतात त्यांना आज देखील तेथे असुरक्षित वाटत असते.
तसेच उरण मधील अनेक ठिकाणी जसे की लाल मैदान, समुद्र किनारपट्टी चा भाग आणि इतरत्र बसण्यासाठी असलेल्या जागा तिथे रात्रीच्या वेळेस दारू पिण्यासाठी लोक बसलेले असतात त्याठिकाणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट्स लावण्याचे आवश्यक असल्याचेही सुचवले. नवी मुंबई आणि उरण परिसरातील ड्रग्सच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारी या सर्व गोष्टीवर भावना घाणेकर यांनी सविस्तर चर्चा केली.यावेळी नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी महिला सुरक्षा, रस्त्यावरील दिवे, सीसीटीव्ही संदर्भातील प्रश्न , ड्रग संदर्भातील आणि इतर संवेदनशील सर्व गोष्टीवर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित केले.