उरण : उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल (Hind Container Terminal) येथे एका टायर कंटेनरमध्ये एक परदेशी जातीचा साप आढळून आला आहे. या सापाची ओळख ‘कॉर्न स्नेक’ (Corn Snake) किंवा ‘रेड रॅट स्नेक’ (Pantherophis guttatus) अशी झाली असून हा उत्तर अमेरिकन खंडातील एक विदेशी (Exotic) प्रजातीचा साप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कंटेनर परदेशातून आयात केलेल्या टायरसह उरण बंदर परिसरात पोहोचला होता. तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या नजरेस एक वेगळ्या नारंगी रंगाचा, आकर्षक पट्टेरी साप दिसल्याने व्यवस्थापना तर्फे त्वरित बचाव कार्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )संस्थेच्या स्वप्नील म्हात्रे या स्वयंसेवकास कळविण्यात आले.
सदर साप बिनविषारी असून मानवाला कोणताही धोका नसतो. या जातीचे साप प्रामुख्याने पाळीव स्वरूपात ठेवले जातात. तथापि, भारतात अशा परदेशी प्रजातींची उपस्थिती पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते. कारण ते इथल्या स्थानिक प्रजातींसाठी प्रतिकूल ठरू शकतात.त्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे जेथून आलेत तिथे पाठविणेच योग्य असते.
या घटनेनंतर फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) च्या जयेश गायकवाड या फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) च्या बचावकर्त्याने घटनास्थळी जाऊन साप सुरक्षितरीत्या पकडून त्याची काळजी घेतली. पुढील कारवाईसाठी वनविभागाकडे सदर ‘साप’ सुपूर्द करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, उरण एन. जी. कोकरे ह्यांच्याशी संपर्क करून वनविभाग पुढील कार्यवाही करत आहे.