सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
  • मनसेची साथ सोडा, मुंबईत आमच्यासोबत या; काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर
  • दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; स्फोटानंतर धुराचे लोट, पायलटबाबत अद्याप अनिश्‍चितता
  • भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, त्यांच्याच जागा बिनविरोध कशा होतात? रोहित पवारांचा हल्लाबोल
  • बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
 DIGITAL PUNE NEWS

खिद्रापूर : अद्भुत खगोलशास्त्रीय प्रकाश पर्वाचे ठिकाण

डिजिटल पुणे    03-11-2025 15:05:06

कोल्हापूर : खिद्रापूर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटेसे गाव..  हे गाव कोल्हापूर शहरापासून साधारण 7० किमी अंतरावर आहे. खिद्रापूर म्हणजे अध्यात्म आणि मानवी सौंदर्याच्या मिलापावर लिहिलेली दगडातील कोरीव कविता आहे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात त्रिपुरारी  पौर्णिमेच्या दिवशी एक अद्भुत घटना घडते.चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा स्वर्गमंडपातील वर्तुळाकार झरोक्यामधून जमीनीवरील चंद्रशिलेसोबत तंतोतंत जुळतो.संपूर्ण भारतात हे प्रकाश पर्व प्रसिद्ध आहे.दिवाळीच्या दीपोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे प्रकाश पर्व अध्यात्म आणि खगोलशास्त्रीय चमत्कार म्हणून हजारो वर्षांपासून चर्चेत आहे.

या प्रकाश-योगायोगाचा अनुभव घेण्यासाठी शेकडो पायांना खिद्रापूरच्या मंदिराची आठवण होते. दिवाळीनंतरच्या दीपोत्सवात कोल्हापूर व महाराष्ट्रासाठी ही एक पर्वणी असते.  चंद्र प्रतिबिंबाचा हा सोहळा पाहण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथून अनेक पर्यटक येतात. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या अनुभूतीला वेगळे महत्त्व आहे.हजारो खगोलशास्त्रीय, देश विदेशातील छायाचित्रणातील मान्यवर या ठिकाणी दिवाळीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला मध्यरात्री एकत्रित येतात. काही क्षणांसाठी वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्रातील अद्भुतता अनुभवण्यासाठी देशभरातील चिकित्सक अभ्यासक या ठिकाणी येत राहतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्राचीन मंदिरांपेक्षा खिद्रापूरचे मंदिर लक्षणीय ठरते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री मंदिरातील हजारो दिवे प्रज्वलित होतात, भजन-कीर्तन, नृत्य आणि दीपोत्सवाचे कार्यक्रम होतात. हजारो वर्षांपासूनचा हा उत्सव या ठिकाणी सुरु आहे.अध्यात्म आणि विज्ञान या ठिकाणी हातात हात घालून निसर्गाच्या अद्भुत चमत्काराला अनुभवते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र या मंदिरातील स्वर्ग मंडपाच्या गोलाकार भागावर येतो त्या ठिकाणावरुन चंद्राचा पूर्ण प्रकाश त्याच आकाराच्या चंद्रशिलेवर पडतो.काही सेकंदांचा हा पूर्णतेचा आनंद असतो. अगदी खगोलशास्त्रज्ञांच्या घड्याळातून घेतलेल्या अंदाजानुसार केवळ सहा ते बारा सेकंदाचा हा परिपूर्ण गोलाकारांचा प्रकाशीय मिलाप असतो.

 या दीपोत्सवासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचे वास्तु शिल्प देखील अभ्यासनायोग्य आहे. देशभरातील शिल्प प्रेमी या मंदिराला कायम भेटी देत असतात. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे,त्यामुळे नद्याच्या प्रवाहाप्रमाणे सजीव व बोलक्या शिल्प सौंदर्याची अनुभूती मंदिराच्या परिसरात कायम येत राहते.

कोपेश्वर मंदिर हे प्रामुख्याने शिव (महादेव) आणि  विष्णू यांना समर्पित आहे. मंदिराची उभारणी साधारणतः चालुक्य व शिलाहार राजवटीत सुरू झाली असावी असे ऐतिहासिक मत आहे. नंतर ११-१२ व्या शतकात शिलाहार व यदुवंशीय राजे यांनी मंदिराचा विस्तार केला. मंदिराला भारत सरकारद्वारे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिलेली आहे.

कोपेश्वर मंदिर हे शिल्पकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ते शिलाहार शैली व मध्ययुगीन महाराष्ट्रातील मंदिरकलांचा संगम दर्शवते. मुख्य मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ व गर्भगृह या भागांमध्ये मंदिर विभागलेले आहे.  बाहेर एका मंडपावर ४८ खांब आहेत, हे मंडप “स्वर्गमंडप” म्हणून ओळखले जाते.

या ४८ खांबांच्या आत एक वर्तुळाकार खुली जागा आहे — ही जागा होम, यज्ञ, हवन यासाठी राखून ठेवली गेली आहे, ज्यामुळे धूर बाहेर निघे. मात्र हेच प्रयोजन त्रिपुरारी पौर्णिमेला अद्भुत खगोलशास्त्रीय निमित्त ठरते.स्तंभांच्या आतील भागावर अनेक देव-देवतांची शिल्पे आहेत.  या मंदिर परिसरात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

मंदिराच्या शिखरापासून ते गर्भगृहापर्यंत अनेक लहान शिखरांची ओळ आहे, जी कलात्मकतेने सजवलेली आहे.खिद्रापूरला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. सांगली मार्गे किंवा गावातील स्थानिक रस्ते वापरुन या ठिकाणी पोहोचता येते. कोल्हापूर पासून केवळ 70 किलोमीटर अंतरावर हे प्रख्यात कोपेश्वर मंदिर आहे.


 Give Feedback



 जाहिराती