सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
  • हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार; काँग्रेसचा पराभव बनावट मतदानामुळे – राहुल गांधींचा आरोप
  • एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे न्यायालयाकडून आदेश
 व्यक्ती विशेष

उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन : “कर्जमुक्तीशिवाय सरकारला मत नाही!” ; भाजपचा पलटवार

डिजिटल पुणे    05-11-2025 16:44:36

धाराशिव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना, दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही, शेतकऱ्यांना शासकीय मदत किती मिळाली, याचा आढावाच ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा, निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड असा लावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय.

उद्धव ठाकरेंनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटलं जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत सरकारला मत देऊ नका. प्रत्येक गावात ‘कर्जमुक्ती नाही, मत नाही’ अशी फलकं लावा आणि ठाम निश्चय करा.”ते पुढे म्हणाले “मुख्यमंत्री म्हणतात ही इतिहासातील सर्वात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. पॅकेजचं काय झालं? शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही? हे सरकार दगाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांनी दगाबाजी सहन करू नये.”

उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांवरही टीका करत सांगितलं “फसल योजनेमध्ये तुम्हाला फसवलं आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम द्यावी, नाहीतर शेतकरी थेट त्यांच्या ऑफिसवर जाणार.”तसंच त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला “केंद्राचं पथक तीन दिवसांनी येतंय, टॉर्च घेऊन रात्री फिरतंय. आता पाहणी करून काय उपयोग? अशा पथकांसाठी फलक लावा  ‘पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा’!”उद्धव ठाकरेंनी सरकारवर हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी भेद पसरवण्याचा आरोप करत म्हटलं,“शेतकरी एकदा उसळला, तर सिंहासन झळून खाक केल्याशिवाय राहणार नाही.”

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला.त्यांनी म्हटलं “उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही, राजकारणासाठी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मदतीचे पैसे थेट खात्यात गेले, पण उद्धव यांच्या काळात फक्त घोषणा झाल्या. आमचं राजकारण कृतीतून मदत करणारं, नौटंकीवर नाही.”दरेकरांनी टोला लगावत म्हटलं,“हे बरं झालं उद्धवजी, मातोश्रीवरून किमान बाहेर पडलात तरी! शेतकऱ्यांप्रती तुमचं प्रेम हे पुतण्या-मावशीचं प्रेम आहे.” धाराशिव दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानांमुळे राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती