नाशिक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारा विकास कामांमध्ये रस्त्यांची कामे महत्त्वाची आहेत. त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन मार्ग काढण्यात येईल.नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सर्वानुमते सहमतीने निर्णय घेण्यात येईल, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागरिकांचा संवाद साधून दिला.यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाशी मोजणी व बाधित होणाऱ्या क्षेत्र याबाबत मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली.