मुंबई – मुंबईतील पॉश सोसायटीत 27 वर्षीय मोलकरणीने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. अँटॉप हिल येथील आशियाना सोसायटीमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय मोलकरणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. या मोलकरणीचे नाव च्योईसंग तमांग असे होते, तिच्यावरती चोरीचा संशय घेतल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका पॉश सोसायटीत घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आशियाना सोसायटीत राहणाऱ्या दाम्पत्याच्या घरी काम करणाऱ्या 27 वर्षीय मोलकरणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचं नाव च्योईसंग तमांग असं असून ती मुळची दार्जिलिंगची रहिवासी होती.
तमांग गेल्या दोन वर्षांपासून आशियाना सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्ध दाम्पत्याकडे घरकाम करत होती आणि तिथेच वास्तव्यास होती. मंगळवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ती घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तिला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं की, संबंधित घरातून सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. या चोरीप्रकरणी तमांगवर संशय व्यक्त करण्यात आला होता. या आरोपांमुळे ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती. त्या मानसिक दबावातूनच तिने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अँटॉप हिल पोलिसांनी या घटनेची अपमृत्यूची नोंद केली असून, तमांगच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही. तरीसुद्धा चोरीमागचं सत्य आणि आत्महत्येची नेमकी कारणं शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.