सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
  • पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येणार? ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसचा सनसनाटी आरोप
  • मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ
 जिल्हा

विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    07-11-2025 16:08:39

मुंबई : जात, पंथ, धर्म, भाषांचे  भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले होते. वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीत गायनप्रसंगी केले.मंत्रालयात वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पद्मजा फेणानी-जोगळेकर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पद्मजा फेणानी-जोगळेकर यांच्यासोबत सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन वंदे मातरमचे गायन करत राष्ट्रभावना दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, तर देशाला जोडणारी, एकसंध ठेवणारी भावना आहे. कोलकाताच्या टाउन हॉलमध्ये 30 हजारपेक्षा अधिक जनता जमली होती. त्याठिकाणी पहिल्यांदा वंदे मातरमची पहिली घोषणा झाली. त्याला प्रतिसाद देत 30 हजार लोकांनी सामूहिक वंदे मातरमचा जयघोष केला. त्यानंतर वंग-भंग चळवळीच्यावेळी प्रेरणा गीत, संघर्ष गीत झाले. त्या दिवसापासून सगळीकडे, इंग्रजांच्याविरुद्ध ‘वंदे मातरम्’ म्हणत लढा सुरू झाला. प्रभात फेऱ्या, कार्यक्रमांमध्ये, आंदोलनामध्ये हल्ला केला तरी ‘वंदे मातरम्’ गायिले जात होते. काँग्रेसच्या अधिवेशनात रविंद्रनाथ टागोरांनी वंदे मातरम् गायिले. यानंतर जात, धर्म, पंथ सगळे विभाजन विसरून संपूर्ण भारतीय समाज एकत्र येऊन वंदे मातरम् चे घोषवाक्य तयार झाले. तेव्हापासून हे एक प्रकारे राष्ट्रगीत म्हणून ‘वंदे मातरम्’ तयार झाले.

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी फाशीवर जातानाही ‘वंदे मातरम्’ म्हणायचे. अहिंसेतून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे, असे म्हणणाऱ्या नेत्यांचे ‘वंदे मातरम्’ घोषवाक्य झाले. स्वातंत्र्याच्या परवलीचा शब्द तयार झाला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान वंदे मातरम् ने दिले. स्वतंत्र भारताचा झेंडा तयार करतानाही त्यावर वंदे मातरम् लिहिण्यात आले. महात्मा गांधी आपल्या प्रत्येक पत्राचा समारोप हा वंदे मातरम् ने करीत. भारताच्या संविधानाच्या निर्मितीनंतर जन गण मन आणि वंदे मातरम् या दोन्ही गीतांना राष्ट्रगीताचा दर्जा देऊन समान सन्मान दिला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

150 वर्ष झाली तरी, आजही वंदे मातरम् ने एक प्रकारे आपल्या भारताला दिशा देणारे गीत आहे. गीतामध्ये आपल्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाती, पंथ, धर्म, भाषा सगळे भेद विसरून प्रत्येकाने वंदे मातरम् म्हटले. वंदे मातरम् हे कुठल्याही एका धर्माचे गीत नाही. सर्व धर्मांना प्रेरणा देणारे प्रेरणागीत, राष्ट्रगीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात वंदे मातरम् सामूहिक गायनाचा कार्यक्रम हाती घेतला तर राज्यामध्येही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही संकल्पना मांडली. यामुळे राज्याच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये सामुहिक वंदे मातरम् चा कार्यक्रम होत आहे. गीताची भावना प्रत्येक तरुण, विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर वंदे मातरम् होत आहे. 1905 साली वंगभंगच्या वेळी आणि स्वातंत्र्य मिळताना जी भावना तयार झाली, तीच भावना संपूर्ण भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी यांचे एक विकसित भारताचे स्वप्न आहे. भारतामध्ये ‘विकास भी और विरासत भी’, अशा प्रकारची भावना त्यांनी मांडली आहे. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत, नालंदा आणि तक्षशिलासारख्या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून जगाला ज्ञान देणारा भारत, भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वात नेणारा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

क्रांतीकारकांना प्रेरणा देणारे समरगीत- मंत्री आशिष शेलार

वंदे मातरम् गीताचे संपूर्ण देशभर गायन होत आहे. या गीताने स्फुरण येते. शब्द, गीत, प्रेरणा म्हणजेच वंदे मातरम् आहे. हे स्वातंत्र्य गीत, आत्मिक प्रेरणा गीत असून क्रांतीकारकांनाही प्रेरणा देणारे समर गीत असल्याचे प्रतिपादन मंत्री आशिष शेलार यांनी केले. सर्व धर्म, जाती, पंथ येवून गीत गातात, यातून एकत्रित जगण्याची प्रेरणा मिळते. जगाला हेवा वाटावा असे एकमेव गीत असल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.यावेळी पूर्वा निर्मिती विश्वतर्फे ‘वंदे मातरम्’वर पथनाट्य सादर करण्यात आले. सर्व धर्म, भाषांमधून विविध पोषाखात हातात वंदे मातरम् लिहिलेले फलक घेतलेले युवक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.कार्यक्रमानंतर दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘वंदे मातरम्’चे सामुहिक गायन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन झाले.


 Give Feedback



 जाहिराती