पुणे : बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने “मराठी रंगभूमी दिन” निमित्त आयोजित कलाकार माता-पिता कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा २०२५ हा भव्य सोहळा अत्यंत थाटामाठात पार पडला.या सोहळ्यात कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक कलाकारांच्या माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये प्रसिद्ध जोशी परिवारातील मातोश्री – श्रीमती ज्योत्स्ना ऊर्फ शामला जगदीश जोशी (गीतकार, संगीतकार, गायिका, लेखिका) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गेल्या ५३ वर्षांपासून कलासंस्कृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्योत्स्नाताई जोशी यांना हा सन्मान मा. सौ. तृप्तीताई देसाई (संस्थापिका – भूमाता ब्रिगेड), जगदगुरूकृपांकित डॉ. चेतनानंदजी महाराज (संस्थापक – जगदगुरू श्री तुकोबाराय विश्व कल्याण मिशन, अयोध्या), तसेच मा. श्री. मेघराजजी राजेभोसले (अध्यक्ष – बालगंधर्व परिवार ट्रस्ट) व सौ. हेमलता वहिनींसाहेब राजेभोसले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
जोशी परिवाराचा कलाक्षेत्रातील वारसा तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे.प्रसिद्ध उमेश जोशी (गुरुजी) हे ज्योतिष वास्तु तज्ञ, गायक, नृत्यकलाकार, लेखक व आजोजक म्हणून परिचित आहेत; परेश जगदीश जोशी, जागृती गो. गादिया–जोशी, तसेच बालकलाकार प्रद्युम्न व पद्मिनी उमेश जोशी हे कला व संस्कृतीचा वारसा पुढे नेत आहेत.
या सोहळ्यात “कृतज्ञता कलाकार माता-पिता सन्मान” ही संकल्पना राबवणारे सुप्रसिद्ध निवेदक, गायक व अभिनेता श्री. चित्रसेनजी भवर यांनी आकर्षक सूत्रसंचालन केले. त्यांच्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार यांची प्रचंड उपस्थिती होती.श्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिर (नाशिक) येथील विश्वस्त व ग्रामस्थ तसेच जोशी परिवाराचे दीर्घकालीन स्नेही भट परिवार यांनी उपस्थित राहून अभिमानाचा हा क्षण साक्षीने पाहिला. जोशी परिवाराचा कलाक्षेत्रातील योगदान आणि मातोश्रींचा हा सन्मान – कलाकार विश्वासाठी प्रेरणादायी ठरला आहे.