कोल्हापूर :राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायतीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती झाली आहे. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांच्या पुढाकाराने, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दोन्ही गट एकत्र आले आहेत. या युतीमुळे चंदगडच्या राजकारणात चुरस वाढली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या जागांवर मूळ ओबीसींना किंवा कुणबी प्रमाणपत्र धारकांना उमेदवारी देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. मात्र, अजित पवार यांनी काकांच्या विरोधात स्वतंत्र गट निर्माण करून महायुतीसोबत सत्तेत प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली होती.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत शरद पवार गट आणि अजित पवार गटाची युती झाल्याची माहिती समोर आली आहे.माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांच्या पुढाकाराने, तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ही युती साध्य झाली आहे. या युतीमुळे चंदगडच्या स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक रंगतदार होणार आहेत.
हसन मुश्रीफ यांनी चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील गटाला एकत्र आणण्याची मोठी कामगिरी केली आहे. भाजपपासून अंतर राखत दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या जागांवर मूळ ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
चंदगड विधानसभा निवडणुकीत परस्परविरोधी असलेले नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील आता “राजर्षी शाहू विकास आघाडी” या बॅनरखाली एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे या आघाडीत काँग्रेसलाही सहभागी करण्याची तयारी सुरू आहे.यामुळे चंदगडमध्ये दोन राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस अशी एकत्रित आघाडी दिसण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात नवा राजकीय प्रयोग पाहायला मिळू शकतो.