उरण : जेष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून 'पक्षी सप्ताह' साजरा केला जातो. दिनांक ०५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या सप्ताहात वनखाते, निसर्गप्रेमी, पक्षी मित्र हे जंगल भटकंती, पक्षी निरीक्षण व नोंदी आणि पक्षी संवर्धनाचे विविध कार्यक्रम करत असतात.या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने फेसबुक व इंन्स्टाग्राम पेज वर तरुण आणि प्रतिभावान चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांनी काढलेली विविध पक्षांची चित्र ही निसर्गमित्र आणि निसर्ग संरक्षण व संवर्धन मोहिमेला चालना देणारी आहेत. तर या पक्षांचे जग उलगडून सांगणाऱ्या व ज्यांच्या जयंतीनिमित्त हा पक्षी सप्ताह साजरा केला जातो, ते प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली आणि ज्येष्ठ निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांच्या निसर्ग संवर्धनातील अमूल्य योगदानाला आदरांजली म्हणून, चित्रकार वरद यांनी या दोन महान व्यक्तिमत्त्वांची बोलकी चित्रे रेखाटली आहेत.वरद यांनी साकारलेली ही चित्रे दोन्ही अभ्यासकांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अतूट बंधाचे सार प्रभावीपणे मांडतात.
या कलाकृतींमधून वरद यांनी निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे, तसेच या दिग्गजांच्या कार्याची आठवण करून दिली आहे.चित्रकार वरद गावंड यांनी साकारलेले "पक्षांचे जग" कला रसिक आणि पक्षी प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे आहे. निसर्गातील रंगछटा, प्रकाश-छाया आणि पक्षांची मोहक मुद्रा, यांचे वास्तववादी चित्रण अप्रतिमपणे साकारले आहे. कलारसिकांना या पक्षांच्या रंगाच्या छटांचा मोह पडल्याशिवाय राहणार नाही.चित्रकार वरद गावंड यांच्या मते, 'पक्षी हे निसर्गाचे रंगदूत आहेत. त्यांच्या रूपातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्याची अनुभूती मिळते'. वरद यांच्या रंग शैलीतून पक्षांचे बाह्यरूपच नव्हे, तर त्यांच्या स्वभावाचे रंग दर्शनही आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चित्रात वापरलेले रंग, अत्यंत नैसर्गिक, वास्तववादी आणि डोळ्यांना सुखावह करणारे आहेत. पक्ष्यांच्या पंखातील प्रत्येक बारकावे आणि त्यांच्या हालचाली मध्ये निसर्ग अधिवासातील बैठकीचा मागोवा चित्रांमध्ये उतरला आहे.आपल्या कलेच्या माध्यमातून पक्षी संवर्धनाची गरज, पर्यावरणीय महत्त्व, निसर्गातील जैव विविधतेचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने आपल्या रंगांच्या माध्यमातून एक पाऊल टाकल्याचे समाधान चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांनी व्यक्त केले आहे.