पुणे : इंदापूर तालुक्यातील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून 500 ते 700 मीटर अंतरावर मानवी डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला. ही घटना 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील कळंब गावच्या हद्दीत कळंब–नीमसाखर रोडवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर अंतरावर एका पुरुषाचा अर्धवट कापलेला डावा पाय आढळून आला आहे. बुधवारी (१२ नोव्हेंबर २०२५) सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना हा पाय रस्त्याच्या कडेला दिसला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांचा पथक घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पायाचा भाग तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा पाय एका पुरुषाचा असून तो डावा पाय आहे. पायात मोजे घातलेले आढळले आहेत. मात्र, हा पाय नेमका कोणाचा आहे आणि तो त्या ठिकाणी कसा आला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, “हा मानवी पाय कोणाचा आहे, हे शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार ही घटना अपघाती आहे की गुन्हेगारी स्वरूपाची, हे स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.”