नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 मधील सर्व प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि प्रगती तपासण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली तयार करण्यात आली असून या प्रणालीमुळे सर्व कामांचे एकाच ठिकाणी निरीक्षण आणि नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ही प्रणाली वापरण्यास सुलभ आणि उपयुक्त असून सर्व यंत्रणांनी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यान्वित करावी, अशा सूचना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.कुंभमेळा प्राधिकरणामार्फत जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणालीत (PMIS) डेटा अद्ययावत करणेबाबत आयोजित प्रशिक्षण सत्रात आयुक्त श्री. सिंह बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करीष्मा नायर व सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, या डिजिटल प्रणालीत सर्व यंत्रणांना नवीन वापरकर्ते आणि संस्था जोडणे, माहिती बदलणे आणि त्यांना आवश्यक अधिकार देणे शक्य होणार आहे. यात नवीन प्रकल्पांची माहिती, नवीन प्रकल्पांची माहिती भरणे, अद्ययावत करणे, त्यातील कामांची यादी आणि पूर्ण होण्याच्या तारखा ठरविणे तसेच त्यांचे टप्पे व देयकांच्या टप्प्यांची माहिती नोंदविता येणार आहे. प्रकल्प किती टक्के पूर्ण झाला व त्याला टप्प्यानुसार लागलेला खर्च दर्शविता येणार आहे. तसेच प्रगती अहवाल दाखविण्यासाठी छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करता येणे यासह विभागाने दिलेल्या निरीक्षणांची नोंद पाहता येणार आहे. यात प्रकल्पा संदर्भातील अडचणी, अडथळे व इतर विभागांकडील प्रलंबित मुद्द्यांची नोंद करणे व त्याबाबत स्मरण करून देणे या सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकल्पासाठी बाह्य तपासणी संस्था नेमली जाणार असून त्यांनी केलेली निरीक्षणे या प्रणालीत नोंदविता येणार असल्याचेही आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले.
ही प्रणाली समजण्यास अधिक सुलभ व्हावी यासाठी याबाबतची वापरकर्ता पुस्तिका, प्रत्येक टॅबची उपयुक्तता व त्याबाबतचे शार्ट व्हिडिओ तयार करून उपलब्ध करून दिले जातील. यासह प्रणाली वापराबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त केले जाणार असल्याचेही आयुक्त श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले.