पुणे : भ्रातृ मंडळ, पुणे तर्फे आयोजित लेवा पाटीदार समाजाचा वधू -वर मेळावा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे उत्साहात पार पडला. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या मेळाव्याला समाजबांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.मेळाव्याला निवृत्त जिल्हा न्यायाधीश संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते हे विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले.
चंद्रकांत नेमाडे,नरेंद्र महाजन,भ्रातृ मंडळचे अध्यक्ष अनिल बोंडे,डॉ.सुहास महाजन,सुधाकर इंगळे,सौ.वनिता पाटील,दत्ता पाटील,जितेंद्र भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात बाराशे वर आणि आठशे वधू यांची सविस्तर माहिती असलेल्या दोन निर्देशिकांचे प्रकाशन करण्यात आले.उपक्रमाचे हे ३५ वे वर्ष असून या मेळाव्यास १८०० वधू-वर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन आरती टोके यांनी केले.
मेळावा अध्यक्ष अनिल बोंडे आणि मेळावा प्रमुख चंद्रकांत नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पुण्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतून लेवा पाटीदार समाजबांधवांनी उपस्थिती लावून मेळाव्याला उत्साहपूर्ण वातावरण दिले.भ्रातृ मंडळाच्या या उपक्रमामुळे समाजातील युवक युवतींना योग्य माहिती, समन्वय आणि संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले असून आगामी काळातही असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
वैवाहिक नात्यात एकमेकांना विश्वास, सन्मान द्या :न्या.संजय पाटील
उपस्थित पाहुण्यांनी वधू-वर निर्देशिकांचे कौतुक करून समाजाच्या पुढाकाराचे अभिनंदन केले.समाजात होत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून विवाहप्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता वाढवण्यास अशा मेळाव्यांची मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय पाटील म्हणाले,'लग्न हा जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.विवाह ही मानवी जीवनातील सुखद घटना आहे. विवाहात दोन कुटुंबे एकत्र येऊन प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकतात. विवाहातील नाते विश्वासावर, एकमेकांना सन्मान देण्यावर अवलंबून असते. त्यातून विवाह संस्था बळकट होईल. सर्वच समाजात घटस्फोटाचा स्फोट झाला आहे, ही गंभीर बाब आहे. कौटुंबिक न्यायालये स्थापन झाल्यापासून खटले दाखल होत आहेत. अकरा हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा पार्श्वभूमीवर वधू वर सूचक मेळाव्यातून सामाजिक, कौटुंबिक जबाबदारीची जाणीव करून दिली जावी.दोन्ही कुटुंबात आनंद निर्माण केला जावा.घटस्फोट संबंधी बऱ्याच प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेत प्रशिक्षित मध्यस्थ दिले जातात. त्यातून समेट घडवून आणण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.एकोपा निर्माण करून एकत्र राहण्याचा सल्ला दिला पाहिजे.जुन्या पिढीच्या अनुभवाचा, समुपदेशनाचा लाभ घेतला पाहिजे.
डॉ. संजय कोलते म्हणाले,' वधू -वर मेळाव्यातून जीवनाचा जोडीदार मिळविण्याची चांगली संधी मिळते.आपल्या क्षमता, आकांक्षा लक्षात घेवून लग्न जुळवले पाहिजे. समाजातील लग्न करू पाहणाऱ्या युवक युवतीना खात्रीचे व्यासपीठ दिले पाहिजे. त्या दृष्टीने भ्रातृ मंडळ संस्थेचे कार्य उपयुक्त आणि दिशा दर्शक आहे.