मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कॉन्सिल हॉलमध्ये आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला जागतिक स्तरावर नेताना विद्यार्थ्यांना भावी रोजगारक्षम कौशल्यांनी सक्षम करणे, राज्यातील विद्यापीठांना NIRF तसेच Global Ranking मध्ये अग्रस्थान मिळवून देणे या महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी व्यापक कृती आराखड्यावर चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाटील म्हणाले, सर्व विद्यापीठांनी डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. यानुसार प्रत्येक विद्यापीठासाठी किमान दोन सदस्यांची स्वतंत्र पथक नियुक्त केले जाणार आहे. हे पथक विद्यापीठांना मार्गदर्शन करणार असून, प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन माहिती तपासेल. यामुळे डॅशबोर्डवरील आकडेवारी निर्दोष व अचूक राहील. विद्यापीठांनी त्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा. दर तीन महिन्यांनी एकात्मिक आढावा बैठक होईल. त्यातून उत्तम परिणाम साधता येतील.तसेच वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व विद्यापीठांनी विशेष सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करावे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू उपस्थित होते.