सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 शहर

वॉक टू स्कूल अनोखी संकल्पना कलमाडी शाळेचा स्तुत्य उपक्रम

डिजिटल पुणे    18-11-2025 11:02:14

पुणे :  दिनांक 14 नोव्हेंबर रोजी डॉ. कलमाडी शामाराव हायस्कूल गणेशनगर मध्ये  'चालत शाळेत चला (वॉक टू  स्कूल) हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. माजी प्राचार्या सौ. पल्लवी नाईक यांच्या प्रेरणेतून पर्यावरणरक्षण ही या मागची भूमिका आहे . सातत्याने गेली आठ वर्ष हा उपक्रम शाळेत राबवला जात आहे.

कोणत्याही वाहनाचा वापर न करता शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व  कर्मचारी यांनी वर्षातून किमान एकदा चालत शाळेत यावे या उद्देशाने बाल दिनाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक आगळीवेगळी संकल्पना यातून अमलात आणण्यात आली.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इंधन वाचवण्यासाठी योगदान देणे आणि विद्यार्थीदशेत रक्तात वाढलेले साखरेचे हानिकारक प्रमाण कमी करण्यासाठी मुलांमध्ये चालण्याची निरोगी सवय लावणे या प्रमुख उद्देशाने याचे आयोजन केले गेले

 पुण्यातील विविध भागातून स्कूलबस ,रिक्षा व पालकांच्या वाहनाने विद्यार्थी रोज शाळेत येतात. 14 नोव्हेंबर रोजी शाळेपासून किमान तीन ते चार किलोमीटर लांब असणाऱ्या विविध भागातून एकाच वेळी रॅली काढून जवळपास सोळाशे विद्यार्थी व कर्मचारी या दिवशी शाळेत चालत आले.पर्यावरण रक्षणाचा संदेश देत  प्लास्टिकचा वापर टाळा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषणाचा वाढता धोका, जागतिक तापमान वाढीचे संकट असे इतर अनेक सामाजिक संदेशाचे फलक हातात घेऊन, घोषणा देत शाळेत चालत येताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.वाढत्या दप्तराचा बोजा लक्षात घेऊन इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या दिवशी विना दप्तर शाळा जाहीर केली गेली होती आणि शाळेच्या तासिकांमध्ये पर्यावरण संबंधी उद्बोधन पर माहिती देण्यात आली. सर्वच वयोगटात वाढलेले मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नित्यनेमाने चालण्याची आवश्यकता या विषयी जागरूकता निर्माण व्हावी .विद्यार्थी, पालक व नागरिक यांच्या मनात पर्यावरण पूरक भावना रुजली पाहिजे हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्याकडून बाल दिनाच्या दिवशी दिला गेला.

 

वॉक टू स्कूल या संकल्पनेबद्दल विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कोथरूड, कर्वे रोड, सिंहगड रोड, वारजे या भागातून शाळेत येणारे सर्वजण वर्षातून किमान एक दिवस  शाळेत चालत आले तर इंधन बचतीचा खारीचा वाटा आपण उचलू शकतो. प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणातील वापर हा निसर्गाला घातक आहे.घरात गोळा होणारे सर्व प्रकारचे प्लास्टिक हे कचऱ्यात न टाकता संपूर्ण वर्षभर दर महिन्याला ठराविक दिवशी शाळेत घेऊन येतात. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळावा व घरातून जमा होणाऱ्या प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावली जावी ही चांगली सवय विद्यार्थी व पालकांच्या मनात जडली आहे.  निसर्ग स्वच्छता, चांगल्या आरोग्य सवयी व पर्यावरण जागृती संबंधी वर्षभर शाळेत राबवले जाणारे उपक्रम हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. 

 हायस्कूलच्या प्राचार्या सौ. अंजली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यांने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. वॉक टू स्कूलच्या या रॅलीत अनेक पालकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन या आदर्श संकल्पनेतून इतर शाळांनीही असे उपक्रम करावेत असे मत व्यक्त केले.


 Give Feedback



 जाहिराती