मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे आणि बायोएरा लाइफ सायन्सेस प्रा. लि., पुणे यांच्यात अत्याधुनिक ‘स्टेट-ऑफ-द-आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च–इन्क्युबेशन लॅब’ स्थापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई येथे विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. कारभारी काळे आणि बायोएरा चे कॉर्पोरेट डायरेक्टर सिद्धार्थ सालुंके राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बायोसायन्सेस-टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नाविन्याचा नवा अध्याय
‘स्टेट-ऑफ-द-आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च–इन्क्युबेशन लॅब’ही राज्यातील पहिल्यांदाच उभी राहणारी नाविन्यपूर्ण इनोव्हेशन हब ठरणार असून शिक्षण–संशोधन–उद्योग क्षेत्रातील दरी भरून काढण्यासाठी विशेषरित्या डिझाइन करण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक संशोधन, स्टार्टअप इनक्युबेशन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण आणि जागतिक आदान–प्रदानाची संधी उपलब्ध होणार आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थी, संशोधक आणि स्टार्टअप टीमना नवीन कल्पना प्रत्यक्ष उपायांमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळणार आहे.
कौशल्यविकास, नाविन्य आणि उद्योजकतेला चालना
लॅबचा उद्देश कौशल्यविकास, उच्चस्तरीय संशोधन, इनोव्हेशन अॅक्सलरेशन आणि उद्योजकतेस प्रोत्साहन देणे हा आहे. या माध्यमातून—संशोधनाचे व्यावसायिकीकरण, आंतरराष्ट्रीय सहकार्य, ज्ञान–तंत्रज्ञान देवाण – घेवाण, सामाजिक परिणामकारक प्रकल्प यांना मोठा हातभार लागणार आहे. आरोग्य, अन्नसुरक्षा, सेन्सरी डेटा, भू-स्थानिक तंत्रज्ञान, मृदा मॅपिंग आदी क्षेत्रातही ही लॅब महत्वाचे योगदान देईल.