मुंबई : शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या स्वायत्त संस्थेतील पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कोर्स रजिस्ट्रेशन फॉर्म व हॉल तिकिटावर आक्षेपार्थ मजकूर छापून आल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई यांनी संस्थेला तातडीने चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संस्थेने चौकशी करून अहवाल सादर केला आहे. याबाबत सायबर सेल आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
संस्थेच्या माहितीनुसार, शासकीय तंत्रनिकेतनाची परीक्षा १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, त्या दिवशी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेला नाही. तसेच, चौकशी समितीने तपासणी केली असता संबंधित विद्यार्थ्याचा कोर्स रजिस्ट्रेशन फॉर्म हा बाह्यरीत्या टेत्परिंग करून त्यावर आक्षेपार्थ मजकूर लिहिला असल्याचे प्राचार्यांनी अहवालात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, सहसंचालक तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई यांनी संस्थेच्या प्राचार्यांना प्रकरणाबाबत सविस्तर तक्रार सायबर सेलकडे तत्काळ दाखल करण्यात आली आहे. काही विद्यार्थी यामुळे परीक्षेला बसू शकले नाहीत, असेही वृत्तांत नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहिला नाही, असे स्पष्टीकरण सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई यांनी दिले आहे.