लोहगाव (पुणे): लोहगाव स्मशानभूमी जवळील गुरुद्वारा कॉलनी परिसरामध्ये सापडलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृत्यू मागचं धक्कादायक सत्य उघड झालं आहे. महिलेचा खून तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने महिलेच्या डोक्यात वीट आणि लाकडी दांडक्याने वार करून आणि मारहाण करून तिचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. खून झाल्यानंतर आरोपीने मृतदेह तब्बल तीन दिवस घरातच लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. घरात व परिसरात दुर्गंधी वाढत असल्याने सर्वांना समजेल या भीतीने आरोपीने आपल्या वडिलांच्या मदतीने मृतदेह रिक्षात टाकून मंगळवारी (दि.१८) पहाटे लोहगाव परिसरात फेकून दिला.
लोहगाव स्मशानभूमी जवळील गुरुद्वारा कॉलनी परिसरात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा विमानतळ पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. महिलेची हत्या तिच्याच प्रियकराने केली असून, मृतदेह नष्ट करण्यासाठी वडिलांच्या मदतीने तो रिक्षातून येथील स्मशानभूमीजवळ फेकून देण्यात आला होता.
तीन दिवस घरात ठेवल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट
आरोपी रवी रमेश साबळे (वय ३०) हा महिलेबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दोघांमध्ये घरगुती वाद वाढत असल्याने १४ नोव्हेंबर रोजी रवीने वीट व लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह तब्बल तीन दिवस घरातच ठेवण्यात आला.
घरातील व परिसरातील दुर्गंधी वाढू लागल्याने सर्वांना संशय येईल या भीतीने रवीने आपल्या वडिलांच्या – रमेश साबळे (वय ६३) – मदतीने मृतदेह रिक्षात टाकून १८ नोव्हेंबरच्या पहाटे लोहगाव स्मशानभूमीजवळ फेकून दिला.
सीसीटीव्ही फुटेज तपासून मागोवा घेतला
विमानतळ पोलिसांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयास्पद रिक्षाचा मागोवा घेतला. लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी व येरवडा परिसरात चौकशी केल्यानंतर तपास पथक थेट येरवड्यातील यशवंतनगर भागामध्ये दाखल झाले आणि अचूक माहितीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. या प्रकरणातील आरोपी रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह इतर तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचं लग्न मोडलं असून दोन मुले आहेत. वडील रमेश साबळे हे रिक्षाचालक आहेत.
महिलेबाबत अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नाही
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तपास करून या प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणला. रवी रमेश साबळे (वय ३०) आणि त्याचे वडील रमेश साबळे (वय ६३, रा. यशवंतनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खून झालेल्या महिलेबाबत अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नाही, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपास येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. निरीक्षक गोविंद जाधव व निरीक्षक शरद शेळके यांच्या देखरेखीखाली नितीन राठोड यांच्या पथकाने उलगडा केला आहे.
दोन पुरूषांनी महिलेचा मृतदेह स्मशानभूमीजवळ टाकला
पोलिस उपायुक्त (झोन ४) सोमय मुंडे यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की, काही रस्त्यावरून जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिला आणि त्यांनी याबाबतची माहिती दिली. विमानतळ पोलिसांचे आमचे पथक मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला. नंतर, शवविच्छेदन अहवालात तिच्यावर हल्ला झाल्याचे उघड झाले. आमच्या पथकाने घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला, ज्यामध्ये असे दिसून आले की सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन पुरूषांनी महिलेचा मृतदेह स्मशानभूमीजवळ टाकला आणि तेथून निघून गेले, अशी माहिती मुंडे यांनी दिली.
दोन-तीन दिवसांत तिच्यावर हल्ला करून हत्या
सोमय मुंडे यांनी पुढे माहिती देताना सांगितलं की, पोलिसांनी त्या दोघांनी मृतदेह स्मशानभूमीजवळ टाकण्यासाठी भाड्याने घेतलेल्या ऑटोरिक्षा चालकाचा शोध घेतला. त्यानंतर ऑटो चालकाने त्या दोघांनी त्याचे वाहन जिथून भाड्याने घेतले होते ते ठिकाण दाखवले. "शवविच्छेदन अहवालात गेल्या दोन-तीन दिवसांत तिच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. तपासानंतर ताब्यात घेतल्यानंतर दोघांनी आम्हाला सांगितले की त्यांनी १४ नोव्हेंबर रोजी तिची हत्या केली," मुंडे म्हणाले.
विमानतळ पोलिसांचे निरीक्षक शरद शेळके म्हणाले, "ही महिला आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशन शिपमध्ये राहत होती आणि त्यांच्यात घरगुती वाद होते, ज्यामुळे ही हत्या झाली." पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.