सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
  • काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
 जिल्हा

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी उपयुक्त – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

डिजिटल पुणे    22-11-2025 14:27:05

मुंबई : आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांनी येथे केले.वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सल्ल्यानुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र व जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात “हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा” या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते वांद्रे (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पंछोली,  कॅनरा बँक मुख्य महाव्यवस्थापक रणजीव कुमार, बँक ऑफ बडोदा महाव्यवस्थापक सुनीलकुमार शर्मा, युको बँक महाव्यवस्थापक संदीप कुमार, पंजाब नॅशनल बँक महाव्यवस्थापक उत्तम कुमार आदि उपस्थित होते.

या उपक्रमाचा उद्देश विविध बँका व वित्तीय संस्थांमधील दीर्घ काळापासून निष्क्रिय किंवा अनाकलनीय ठेवी, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) यांसारख्या मालमत्तेबाबत जनजागृती करणे आणि योग्य हक्कदारांना माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, रिझर्व्ह बँक आणि सहभागी सर्व बँकांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक बॅंकेच्या ठेवी व्यवहार प्रक्रियेत अनभिज्ञ असतात. अनेकदा माहितीअभावी किंवा प्रक्रियेची अज्ञानता यामुळे बँकांमधील खातेदारांची  निष्क्रिय रक्कम उपयोगात येत नाही. ती ग्राहकांना सुलभरित्या मिळावी या व्यापक उद्देशाने  ही मोहीम राबवण्यात येत आहे. बॅंक खात्याच्या प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी ही मोहीम ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून डिसेंबर पर्यंत या  शिबिरांचे  आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारा ग्राहकांच्या खात्यावर असलेला पैसा त्यांना वितरित करता येईल. यामध्ये बॅंकाची भूमिका महत्त्वाची असून नागरिकांना त्यांच्या बॅंक खात्यातील हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी हा उपक्रम  उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरात सहभाग घेऊन स्वतःची किंवा कुटुंबीयांची अनाकलनीय ठेवी व वित्तीय मालमत्ता तपासून आवश्यक दावा सादर करावा. वरिष्ठ बँक अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांचे अधिकारी या शिबिरात उपस्थित राहणार आहेत, तरी या संधीचा लाभ घेत बॅंक ग्राहकांनी ही मोहीम यशस्वी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य महाव्यस्थापक पुनीत पंछोली म्हणाले की, दावा नसलेला ग्राहकांचा जो पैसा आहे तो त्यांना परत मिळावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक खातेधारकांनी नामनिर्देश नमूद केलेले नसल्याने या खात्यांबाबत त्यांचे पैसे संबंधितांना परत देण्याची प्रक्रिया करण्यात बॅंकेला अडचण येते. त्यामुळे तो पैसा खातेदाराला परत करता येत नाही.

तरी खातेधारकांनी आपल्या संबंधित माहिती, नामनिर्देशन या सर्व बाबींची पूर्तता करण्याची खबरदारी बाळगावी. खातेदारांच्या सुविधेसाठी उदगम पोर्टल खुप उपयुक्त असून त्यावरून आपल्या सध्याच्या तसेच जुन्या खात्याची माहिती मिळते, त्याचा लाभ घ्यावा. सर्व खातेधारकांनी आपले बॅंक खाते सक्रिय ठेवावे, केवायसी, संपर्क क्रमांक, पत्ता हा तपशील वेळोवेळी अद्ययावत करावा. आपल्या खात्याच्या व्यवहाराबाबत सतर्क राहावे. यासाठी ग्राहकांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य बॅंकानी करावे, या उपक्रमातून आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्या गेले आहे, असे पंछोली यांनी सांगितले.

आर्थिक साक्षरता वाढवणे, नागरिकांना वित्तीय दाव्यांच्या प्रक्रियेची माहिती देणे आणि विविध बँक व वित्तीय संस्थांत जमा असलेल्या निष्क्रिय रकमा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेत नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. खात्यात प्रदिर्घ काळापासून पडून असलेल्या अव्यवहित मालमत्ता परत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे मार्गदर्शन मिळाल्याने अनेकांना प्रत्यक्ष मदत झाली. आपल्या रकमेची माहिती मिळण्यासाठी, खात्री करण्यासाठी आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी कार्यक्रम स्थळी विविध बँकांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जुन्या किंवा निष्क्रिय खात्यांची त्वरित तपासणी, विमा पॉलिसी, मुदतठेवी, पीएफ किंवा इतर वित्तीय साधनांशी संबंधित माहिती, दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मार्गदर्शक माहिती, थेट संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मिळवता आली.

यावेळी लाभार्थी ग्राहकांना ॲक्टिव्हेशन प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आर्थिक क्षेत्रातील दावे या विषयावर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बडोदा बॅंकेचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कांतीलाल बाविस्कर यांनी यावेळी आभार मानले.

निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभर शिबिरे

निष्क्रीय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभरात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरादरम्यान नागरिकांना निष्क्रिय खात्यांची माहिती, दाव्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती