उरण : गेली अनेक वर्षे भाजप कडे उरण नगर परिषदेची सत्ता असूनही भाजपने उरण शहराचा विकास केला नाही. आता निवडणूक जवळ आल्याने मतदारांना गोंजरविण्याचे काम सुरु आहे. मोरा येथे अनेक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कचरा साफ केला जात नाही. अनेक ठिकाणी वीज नाही. कुठे पिण्यासाठी पाणी नाही. अनेक ठिकाणी गटारे साफ नाहीत. काही ठिकाणी शौचालयांची अवस्था खूपच वाईट आहे. रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत. असे अनेक समस्या आहेत.वर्षानुवर्षे येथील समस्या सुटत नाहीत . उलट कोणी आवाज उठविला तर त्यांचे नळ कनेक्शन बंद केले जातात. त्यांना दमदाटी केली जाते. धमकविले जाते.
आता मात्र हे चालणार नाही. आम्ही कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. मोरा येथील नागरिकांना, जनतेला कोणी धमकावत असेल, दादागिरी करत असेल तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. नागरिकांनो आता तुम्ही घाबरू नका. तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या सर्व अडी अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. उरणच्या सर्वांगीण विकासासाठी आपले अमूल्य मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना द्या असे आवाहन भावनाताई घाणेकर यांनी उरण येथे केले.
उरण नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र निर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष,कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार भावनाताई घाणेकर आणि एकूण १० प्रभागातील महाविकास आघाडीचे २१ अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक २५/११/२०२५ रोजी उरण शहरातील साईबाबा मंदिर समोर मोरा येथे संध्याकाळी ७ वाजता कॉर्नर सभा भरविण्यात आली होती .
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहरशेठ भोईर, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाध्य नरेश रहाळकर,गटनेते गणेश शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस तथा कामगार नेते रवि घरत,फहाद अहमद,सतीश पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावनाताई घाणेकर,नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक १ अ चे उमेदवार प्रीती कोळी,प्रभाग क्रमांक १ ब चे उमेदवार राकेश कोळी, प्रभाग क्रमांक २ अ चे उमेदवार रसिका मेश्राम, प्रभाग क्रमांक २ ब चे उमेदवार विक्रांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
भावनाताई यांनी आपल्या आक्रमक व वेगळ्या शैलीत जनतेशी संवाद साधत विरोधकांवर निशाणा साधला यावेळी त्यांनी जयवीन कोळी यांच्यावर अनेक आरोप केले.यावेळी तुमच्या समोर महाविकास आघाडी तर्फे चांगले उमेदवार उभे असून नगराध्यक्ष म्हणून भावना घाणेकर,नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक १ अ चे उमेदवार प्रीती कोळी,प्रभाग क्रमांक १ ब चे उमेदवार राकेश कोळी, प्रभाग क्रमांक २ अ चे उमेदवार रसिका मेश्राम, प्रभाग क्रमांक २ ब चे उमेदवार विक्रांत म्हात्रे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन भावनाताई यांनी केले.
या प्रसंगी उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस तथा कामगार नेते रवि घरत यांनी केंद्र सरकारने बनविलेल्या ४ श्रम कायद्यावर टीका केली.
बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहे. नोकरी, कामात स्थानिकांना प्राधान्य नाही. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे असे मत व्यक्त करत उरणच्या विकासाची दोरी भावनाताईच्या हातात द्या. ताई नक्कीच आदर्श नगरपरिषद बनवेल. आम्ही सर्व विकासाच्या जोरावर लढतोय त्यामुळे सर्वांनी आघाडीला निवडून द्या असे आवाहन रवि घरत यांनी केले. गटनेते गणेश शिंदे यांनी उरण नगर परिषदेच्या विविध कामावर, कार्य पद्धती वर बोट दाखवत व सत्ताधारी पक्षाला टार्गेट करत प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोणकोणते कामे केली याचा पाढाच वाचला. भवरा व मोराचा विकास शिवसेनेनेच करून दाखविले हे ठासून सांगितले.माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही शिवसेनेने केलेल्या अनेक विकास कामांची माहिती देत भवरा मोरा येथील जनतेला विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप सत्ताधारी पक्षावर केला. यावेळी गोपाळ पाटील, नरेश रहाळकर, फहाद अहमद आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.एकंदरीत या कॉर्नर सभेला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.