नागपूर : वाचनाने भाषा व अभिव्यक्ती विकसित होते, निर्णयक्षमता सुधारते. वाचन संस्कृती ही भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. पालकांनी पाल्यांसमोर पुस्तक वाचन, घरात पुस्तकांचा संग्रह असणे व मुलांना पुस्तक प्रदर्शनात घेवून जाणे अशा कृतीशिलतेतून पाल्यांमध्ये वाचन संस्कृती रूजेल, असे मत बालसाहित्यिक प्रशांत वि. गौतम यांनी आज येथे व्यक्त केले. ‘वाचन संस्कृती आणि पालकांची भूमिका’ या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक कार्यालयात आयोजित व्याख्यानात श्री. गौतम यांनी मार्गदर्शन केले. माहिती संचालक डॉ. गणेश व. मुळे अध्यक्षस्थानी होते.
वाचनाचे संस्कार घरातून मिळतात. वाचनस्नेही वातावरण निर्माण करण्याची महत्वाची भूमिका पालकांची असते. संस्कृती, आचार-विचार, व्यक्तीमत्व निर्माण करणारी पुस्तके घरात असावीत. पाल्यांमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी पालकांनी सजगतेने वागण्याची गरज असल्याचे श्री. गौतम यांनी अधोरेखित केले. लेखकापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात वडिलांकडून मिळालेल्या वाचनाच्या पोषक वातावरणाचा अनुभव त्यांनी कथन केला. बालसाहित्य लेखन प्रवासात वृत्तपत्रांच्या पुरवणीतील बालकथा, दिवाळी अंकातील बालकथा आणि प्रत्यक्ष पुस्तक लिखान त्यांनी उलगडला.
बालकांच्या 6 ते 18 वर्ष वयोगटातील तीन टप्प्यांनुसार कुतूहल जागविणारी पुस्तके, विचारास चालना व चौकस बनविणारी पुस्तके आणि मुलांचे मानसशास्त्र विकसित करून प्रेरणादायी ठरणारी पुस्तके पालकांनी मुलांना द्यावीत. घरात लिळाचरित्र, तुकारामगाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथ असावेत. पुस्तके वाचून ती इतरांना हस्तांतरीत करावीत. पुस्तकातून मिळालेले ज्ञान इतरांना सांगावे, असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमांचा योग्य वापर करून समाजात वाचनसंस्कृती वृद्धिंगत करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. गणेश मुळे यांनी वाचनसंस्कृतीचे महत्व अधोरेखित करतांना वाचनाने समृद्ध असणारे व्यक्तीमत्व हे समुहामध्येही कसे वेगळे दिसून येते आणि पाल्यांवर करावयाच्या वाचन संस्काराची आवश्यकता विशद केली. माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी सुत्रसंचालन केले तर सहायक संचालक पल्लवी धारव यांनी आभार मानले.