उरण : सत्ताधारी, सरकारी कर्मचारी हातात हात घालून उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत दुबार मतदारांचा खेळ करत आहे. निवडणूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याकडे या अधिकाऱ्यांच्या आणि सत्ताधारी लोकांच्या संभाषणाच्या कॉल रेकॉर्ड आणि स्क्रीनशॉट्स आहेत, हे पुरावे आम्ही आमच्या वरिष्ठांना दिले आहे. येत्या अधिवेशनात यांचा भांडाफोड करणार असा सनसनाटी आरोप उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
याबाबत सविस्तर बोलताना भावना घाणेकर म्हणाल्या की, उरणच्या आमदार स्वतः ५००० मतांनी निवडून आले आहेत मात्र त्यांनी ४००० मतांनी नगराध्यक्ष निवडून येणार असा दावा जाहीरपणे केला आहे. मतचोरीच्या जोरावर आमदार हा दावा करत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्याबाबत आमच्या पुरावे आहेत. उरण नगरपरिषद मतदार यादीत ४२१० मतदार असे आहेत की ज्यांचा पत्ता निवडणूक यादीत नाही, १५१६ दुबार मतदार ह्या यादीत अढळलेत, ह्या गोष्टीची निवडणूक आयोगाकडे तक्रार करून देखील ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि ही गोष्ट फेटाळली गेली असं त्या म्हणाल्या.
उरण नगरपरिषदेची निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे ह्यासाठी आमचे पूर्णपणे प्रयत्न असेल परंतु काही सरकारी कर्मचारी सत्ताधाऱ्यांच्यात सहभागी होऊन त्यांना मदत केल्याच समोर येत आहे. आमदार स्वतः जनतेला जाऊन सांगतात की तुमचा फेक आयडी बनवून दिला जाईल, तुम्ही सकाळी लवकर जाऊन मतदान करा जेव्हा बूथ रिकामे असतात. आमचा संपूर्ण प्रयत्न असेल ही निवडणूक पारदर्शक व्हावी परंतु जर सत्ताधारी आणि सरकारी कर्मचारी असं वागणार असतील तर आम्ही देखील हे खपवून घेणार नाही आणि ह्याचे सडेतोड उत्तर देण्यात येईल असं त्या म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेस माजी आमदार मनोहरशेठ भोईर, गटनेते गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते मिलिंद पाडगावकर, मनसेचे युवा नेते सतीश पाटील आदी नेते,पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा सुद्धा प्रकाशित करण्यात आला. जाहीरनामा मध्ये आरोग्य, शिक्षण कला क्रीडा सांस्कृतिक, धार्मिक, रोजगार, आरोग्य आदी मूलभूत विषयावर प्रश्न सोडविण्याचे वचन देण्यात आले आहे.