उरण : "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ पवित्र दान आहे. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळते. गरीब असो वा श्रीमंत, कुणालाही परिस्थितीनुरूप रक्ताची गरज लागते. त्यामुळे रक्तदान शिबिर भरवण्याचे न्हावाशेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संघटनेचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेली अनेक वर्षे संघटनेचा सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत पिरकोन येथे म्हणाले. रक्तदान शिबिराचे आयोजन पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तेरणा ब्लड बॅंक नेरूळच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी न्हावाशेवा सी. एच. ए. आधार सामाजिक संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अविनाश ठाकूर तसेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच न्हावाशेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संघटनेचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.