उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हा कार्यक्रम कार्यवाह प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य गजानन चव्हाण होते, तर जेएनपीए हॉस्पिटलच्या डॉ. वर्षा यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच आरोग्य सेवा कर्मचारी उज्वला निकाळजे, सुषमा म्हात्रे आणि पूजा गावंड उपस्थित होते. आरोग्य सेविका उज्वला निकाळजे यांनी एड्स विषयक मूलभूत माहिती, प्रतिबंध आणि जनजागृतीचे महत्त्व यावर प्रबोधनपर व्याख्यान दिले.
डॉ. वर्षा यादव यांनी विद्यार्थ्यांची जागरूकता वाढवून समाजातील एड्ससंबंधित गैरसमज व कलंक दूर करण्याची गरज यावर भर दिला. एड्स मुळे होणारे मानवी श्रमशक्तीचे नुकसान व आरोग्य सेवेवरील ताण तणाव याची सखोल माहिती दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात गजानन चव्हाण यांनी एड्स रुग्णांप्रती समाजातील वर्तनाची उदाहरणे सांगितली आणि विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता तसेच स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल पाटील यांनी केले. डॉ. आर. एस. जावळे आणि डॉ. धरती घरत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य केले.या जनजागृती कार्यशाळेस बी.एस्सी. तील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.