उरण : "वारकरी, मंदिरे, शाळा, क्रिकेट, कलावंत आणि दीन-दुबळे, गरजवंत यांना साह्य करणे मी माझे कर्तव्य समजतो. जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात मंदिरांना आणि वारकरी मंडळींना सहकार्य करण्यात मी कधीही हात आखडता घेतला नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वारकरी हे या भूमीचे पाईक आहेत. ते तुकोबा, ज्ञानोबा, विठ्ठल-रखुमाईचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे वारकरी हा माझा श्रद्धेचा विषय आहे. आषाढी-कार्तिकीला मी पंढरपूरला आवर्जून जातो. तेथे गेल्यानंतर जे समाधान मिळते ते अफलातून असते. वारकरी बांधव हे संस्कृती रक्षक आहेत. त्यांच्या भजन-कीर्तनाच्या परंपरेने महाराष्ट्राचे नाव जगात अभिमानाने घेतले जाते. पाय जमिनीवर ठेवून मातीशी घट्ट नाते असलेल्या वारकऱ्यांचे योगदान महाराष्ट्र या संत भूमीत अनन्यसाधारण आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत मंगळवारी (ता. २) मोहोपाडा येथे म्हणाले.
रिस येथील निवृत्ती महाराज मुंढे म्हणाले, "वारकरी सांप्रदायासाठी सढळ हाताने मदत करणारे म्हणजेच महेंद्रशेठ घरत! सामाजिक कार्यासाठी मदत करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. आमचा सप्ताह गेली १२ वर्षे अखंड चालू आहे. दरवर्षी आम्हाला ते ५१ हजार रुपयांचे साह्य करतात. त्यांचा साह्य करण्याचा पिंड आम्हा वारकऱ्यांसाठी खूप मोलाचा आहे. त्यांचे थोरपण, मोठेपण आणि मोलाचे योगदान जगावेगळे आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. गरीब दीन-दुबळ्यांना मदत करण्यासाठी त्यांना आम्हा वारकरी मंडळींचा नेहमीच आशीर्वाद असेल."
वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ, रसायनी, पाताळगंगा, खालापूर, पनवेल परिसर अखंड हरिनाम सप्ताह जनता विद्यालय मोहोपाडा, रसायनी येथे सुरू आहे. त्यांना ५१ हजार रुपयांचे साह्य महेंद्रशेठ घरत यांच्याकडून करण्यात आले. या सप्ताहात पनवेल पंचक्रोशीतील हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. वारकरी, भजन-कीर्तनकारांच्या सेवेमुळे परिसर भक्तिमय झाला आहे.