मुंबई : राज्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.आरोग्य भवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आरोग्य सेवा सचिव डॉ. निपुण विनायक व ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य सेवा गट- ब (बीएएमएस) हे पद असून, या पदावर सेवा प्रवेश नियमानुसार दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांना सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गत 1995 पासून राज्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.