मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातून दोन वाघांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन वर्षांच्या ‘रुद्र’ नावाच्या वाघाचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अधिकृत अहवाल अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच येथे असलेला ‘शक्ती’ वाघाही संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळला होता.या प्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर आता राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, शक्ती वाघाच्या मृत्यू आधी काही दिवस रुद्रचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शक्ती आणि करिष्मा यांचा रुद्र हा बछडा होता. राणीच्या बागेतच त्याचा जन्म झाला. तीन वर्षाच्या रुद्र वाघाचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, मात्र मृत्यूचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, रुद्रचा मृत्यू आधी झाला आणि त्यानंतर शक्ती वाघाने प्राण सोडले, तरीही या दोन्ही प्रकरणांची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने वेळेत जाहीर केली नाही, असा आरोप व्याघ्रप्रेमींनी केला आहे. रुद्र हा शक्ती आणि करिष्माचा बछडा होता आणि त्याचाच राणीबागेत जन्म झाला होता.
मृत्यूची माहिती दडवली का? — उपस्थित झाले प्रश्न
दोन्ही वाघांचे मृत्यू अहवाल अद्याप जाहीर झालेले नसल्यामुळे आणि अधिकृत कारण प्रशासनाकडून स्पष्ट न करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी प्रशासनावर निशाणा साधत सात दिवसांत स्पष्ट भूमिका मांडण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू
शक्ती वाघाच्या मृत्यूबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप केला जात आहे.श्वसननलिकेजवळ हाड अडकल्यामुळे शक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्याच्यावर उपचार का झाले नाहीत, ही माहिती का दडवली गेली, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
शवविच्छेदनाआधी मृतदेहाची विल्हेवाट? – व्याघ्रप्रेमींचा सवाल
व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून शक्ती वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झालेला आहे. प्राणीसंग्रहालय प्रसासन व त्याच्यावरती उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा झाल्याने हा मृत्यू झाला आहे. शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिध्द न करणे, त्याची माहिती न देणे, यामागचं नेमकं काय कारण आहे, हे सर्व लपवून का ठेवण्यात आलं, त्यामागे काय कारण होतं? व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचा मृत्यू झाला तर वनविभाग त्याची बातमी दुसऱ्या दिवशी जाहीर करते पण वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आठ दिवस उलटूनही याची बातमी जाहीर न करणे, यामागचं कारण काय आहे, या वाघाचा मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वसननलिकेजवळ एक हाड अडकून त्याचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्यावरती उपचार का गेले नाहीत? त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट लपवून ठेवण्यामागचं कारण काय आहे, याच्यामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर त्याचा शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली,याचं काय कारण आहे, असा सवालही व्याघ्र प्रेमी प्रथमेश जगताप यांनी उपस्थित केला आहे.