छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स हॉस्टेल व ओल्ड एज होम उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक जागा, सुविधा आणि निधी नियोजन याबाबत तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा), कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला मुख्य अधिकारी श्री. दत्तात्रय नवले, उप मुख्य अधिकारी श्री. जयकुमार नामेवार व कार्यकारी अभियंता श्री. सुधाकर बाहेगव्हाणकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी असून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल व ओल्ड एज होम उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शासन म्हाडास सर्वोतपरी मदत करेल, असेही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामध्ये सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या योजनांची तसेच मंडळास्तरावर अद्यापपर्यंत एकुण किती प्रकल्प पूर्ण झाले, पीएमएवाय व 20 टक्के अंतर्गत सुरू प्रकल्प, पूर्ण झालेले प्रकल्प, प्रस्तावित प्रकल्प, गाळे, भुखंड,सदनिका, तसेच दुकाने व अनिवासी भुखंड किती शिल्लक आहेत तसेच पैकी शिल्लक गाळे,सदनिका,भुखंड तसेच दुकाने व अनिवासी भूखंड विक्रीचे नियोजन याबाबतही आढावा घेण्यात आला. विविध योजनांचा आढावा घेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी मंत्री डॉ. भोयर यांनी दिले.
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा महसुली जमा निधी किती आहे याबाबतचा आढावा घेत जास्तीत जास्त प्रकल्प राबवून महसूल वाढवण्याच्या दृष्टीने कामकाज करा तसेच म्हाडाकडे असलेल्या जागांचा आढावाही घेण्यात आला. जिल्ह्यातील शासनाच्या जागेपैकी किती जागा म्हाडाच्या प्रकल्पासांठी मिळू शकतात त्याची माहिती घेवून जास्तीत जास्त प्रकल्प राबवा. तसेच म्हाडा प्रकल्पांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.यावेळी म्हाडाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.