नागपूर : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम समारोहाचे भव्य प्रमाणात प्रथमच आयोजन होत आहे. सुमारे 5 लाख भाविक या निमित्ताने विदर्भातील सर्व जिल्ह्यातून येत आहेत. या समारोहाच्या व्यवस्थापनासाठी 25 पेक्षा अधिक विविध समित्या, विविध शासकीय विभाग प्रमुख अहोरात्र काम करीत आहेत. शीख समाजासह इतर समाजाचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. सर्वांच्या योगदानातून नवा इतिहास निर्माण करु पाहणाऱ्या या कार्यक्रमाच्या सकारात्मक उर्जेला अधिकाधिक प्रवाहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
कोणत्याही मोठ्या आयोजनात वेळेवर काही कमतरता उद्भवतात. यावर तात्काळ मात करता यावी यासाठी सर्व समित्यांना निर्देश दिलेले आहेत. याचबरोबर हा समारोह स्वंयशिस्तीचा, आपल्या सेवातत्परतेचा म्हणून पाहिला जात आहे. येथील प्रत्येक सहभागी हा त्याच जबाबदारीने सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर मधील हा भव्य कार्यक्रम नवा आयाम निर्माण करणारा असेल. शासन, शीख व इतर धर्मीय समाज यांच्याबरोबर सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर अधिक जबाबदारीने आपल्या वार्तांकन व चित्रीकरणाबाबत काळजी घेईल, असेही ते म्हणाले.नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या या भव्य समागम कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.