सांगली : सांगली शहर येथील खणभाग सि.स.नं. १ मधील खाजगी मिळकत धारक यांचे सत्ता प्रकार ‘एल’ मधून ‘ए’ मध्ये रुपांतरीत केलेल्या मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठीया, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, नगर भूमापन अधिकारी, कर्मचारी, मिळकतींचे मिळकत धारक उपस्थित होते.
सांगली शहर खणभाग येथील सत्ता प्रकार ‘एल’ या धारणाधिकार सत्ताप्रकाराच्या शासकीय जमिनीचे ‘ए’ या सत्ताप्रकारात रूपांतरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या निर्णयानुसार एकूण 64 मिळकतीचे रूपांतरण करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये 60 मिळकतीस जिल्हाधिकारी यांच्याकडील दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशाने मिळकतीवर फेरफार घेण्यात आला. सदर मिळकत पत्रिकेस सत्ताप्रकार ‘एल’ (सरकारी जागा व इमारती) हा 1928 साली दाखल झाला होता. तो ‘ए’ करण्यात आल्यावर संबंधित मिळकत धारकास दिलासा मिळाला आहे. झालेल्या कार्यवाहीबाबत मिळकत धारकांनी समाधान व आभार व्यक्त केले.