सांगली : सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील बिळूरमध्ये प्रवचनात लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरगौंड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी ता. बसवन बागेवाडी जि. विजयपूर) यांनी फिर्याद दिली आहे. धर्माच्या आरक्षणाच्या अनुषंगाने काडसिद्धेश्वर महाराज यांनी वक्तव्य केले होते. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींवर कर्नाटक राज्यातील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो आज जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला .फिर्याद शंकरगौंड शिवनगौंड बिरादार (रा. बसवन बागेवाडी, जि. विजयपूर) यांनी केली असून, प्रवचनातील वक्तव्ये समाजात "द्वेषभावना पेरणारी आणि एकोप्याला धक्का देणारी" असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अगोदर कर्नाटकातील बसवन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्याच गुन्ह्याची नोंद आता जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
काडसिद्धेश्वर महाराजांची प्रतिक्रिया: "कर्नाटक सरकार महापाप करत आहे"
गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की,“कर्नाटकमध्ये लिंगायत समाज तोडण्याचे महापाप तेथील लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहेत. हिंदू धर्म तोडण्याचे काम सुरू होते, त्यामुळे असं करणं योग्य नाही हे मी स्पष्टपणे सांगितलं.”त्यांनी पुढे आरोप केला की, संबंधित मंत्र्यांनी "कुत्सित हेतूने तक्रार दाखल" केल्याची माहिती मिळाली असून संपूर्ण कारवाई ही राजकीय दबावामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.“समाज जोडण्यासाठी वर्षानुवर्षे श्रम करावे लागतात; पण तोडण्यासाठी काही क्षण पुरतात. मी प्रवचनातून समाज एकत्र राहावा हा संदेश दिला. तरीही माझ्यावर खोडसाळपणे गुन्हा दाखल केला गेला,” असे महाराजांनी स्पष्ट केले.
कारवाईवर पोलिस काय म्हणाले?
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचे 9 ऑक्टोबरला बिळूर विरक्त मठात प्रवचन झाले होते. त्या प्रवचनातील वक्तव्यांवर फिर्यादी बिरादार यांनी आक्षेप घेतला आहे. द्वेषभावना पेरण्याच्या उद्देशाने एकोप्याला धक्का आणणारे वक्तव्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहेत काडसिद्धेश्वर महाराज?
पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी 1989 मध्ये मठाधिपती पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आरोग्य, शिक्षण, गावविकास, शेती आणि संस्कृती या क्षेत्रांत अनेक उपक्रम राबवून आत्मनिर्भर समाज घडवण्याचे काम केले. 1991 पासून पूज्यश्री यांनी समाजातील वंचित आणि दुर्बल लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कणेरी गावाला आपली ‘कर्मभूमी’ मानली. गावातील समस्या सोडवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तरुणांनी स्वतः पुढे येऊन आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी घ्यावी. अशा प्रकारे त्यांनी तरुणांना आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे.