नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम आणि कन्व्हेंशन सेंटरच्या डागडुजीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.कामठी मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा) अतुलकुमार वासनिक, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता संजय चिमूरकर, आणि नरेश लभाने, अभियंता आशिष तामगाडगे आदी उपस्थित होते.
ऑडिटोरियम हॉलच्या बाल्कनी भागातील शीतवाहक डक्ट, शीतवाहक यंत्रणेच्या पाईप्सचे इन्स्युलेशन, कॉन्फरन्स रुममधील एअर हँडलिंग युनिट, व्हीआयपी गेस्ट रूम, डिझेल जनरेटर, एक्झिट गेटकडील पाण्याच्या भूमिगत टाकीला वॉटर प्रूफिंग, बेसमेंट पार्कीग आदींची चर्चा बैठकीत करण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी दिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 40 फुट उंचीचा पुतळा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.