नागपूर : राज्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरवासीयांना नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
पुणे महानगर नियोजन समितीच्या पाचव्या सभेचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रीपरिषद सभागृहात करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सर्वश्री तानाजी सावंत, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे महानगरसाठी विहित कालमर्यादेत ‘स्ट्रक्चर प्लॅन’ तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण यांचा विचार करण्यात यावा. प्लॅन तयार करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी. विकासाचे नियोजन करताना विविध प्राधिकरणांकडे काही क्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी न देता संपूर्ण क्षेत्राचा विकास एकाच प्राधिकरणाने करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पुणे महापालिकेत 30 जून 2021 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचे विकास नियोजन पुणे महापालिकेने करावे. पुणे ग्रोथ हबसाठी विकास आराखडा शासनाच्या मित्रा संस्थेकडून करण्याबाबत पडताळणी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. पुणे शहरामध्ये माण- म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. शहरामध्ये एकीकृत टाउन प्लॅनिंगच्या 15 योजनांवर काम सुरू असून यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. वेळेत योजना पूर्ण झाल्यास त्याचा लाभ सर्वांना होतो, त्यामुळे कुठेही विलंब न लावता या योजनांची कामे पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुणे विद्यापीठ जवळील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची वाट न बघता नागरिकांच्या सेवेसाठी तो सुरू करावा. पुणे महानगर समितीच्या सर्व सदस्यांसमवेत कार्यक्रमाचे आयोजन करावे, त्यामध्ये सर्वांची मते जाणून घेत पुणे शहरासाठी भविष्याचा वेध घेणारा ‘कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ तयार करण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देशित केले.
बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ पी गुप्ता, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता यांच्यासह पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी सहभागी झाले होते. पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले.
पुणे महानगर प्रदेशात सुरू असलेली विकासकामे
पुणे महानगरात 589 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची 127 कामे सुरू, शहरांतर्गत 83 किलोमीटर लांबीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प, पुणे शहराअंतर्गत विकास केंद्र, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ जोडणीसाठी रस्त्यांची कामे सुरू, पूल आणि उड्डाणपुलाची तीन कामे सुरू, गृहनिर्माण प्रकल्पांची तीन कामे, पाणीपुरवठा योजनांचे चार कामे सुरू असून वाघोली पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे.
पुणे महानगरात सुरू होणारी कामे
पवना, इंद्रायणी, मुळा व मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनाची तीन कामे, चौकांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 17 कामे, 10 पर्यटन विकास केंद्रांची कामे, स्कायवॉक, मल्टी मॉडेल हब प्रकल्पाची पाच कामे लवकरच सुरू होणार आहेत.
येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग
येरवडा ते कात्रज दरम्यान 20 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्गाच्या फिजीबिलिटी पडताळणीचे काम सुरू असून यासाठी अंदाजित 7 हजार 500 कोटी रुपयांची निधी लागणार आहे.