मुंबई: आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या रणनीतीवर चर्चेला गती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, महत्त्वाच्या महापालिकांसाठी महायुतीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे.काल रात्री नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या महापालिकांसाठी स्थानिक समिती स्थापन करून युतीबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिका एकत्र लढवण्याबाबत वरिष्ठ नेते सकारात्मक आहेत.
भाजपाच्या सर्व्हेमध्ये मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एक विशेष निरीक्षण समोर आले आहे. मुंबईतील 18 वॉर्डमध्ये, जिथे 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मुस्लिम बहुल आहे, तिथे भाजपला विरोध असूनही एकनाथ शिंदेंना मतदारांमध्ये पसंती आहे. या जागांवर जर एकनाथ शिंदेच्या नावाने उमेदवार उभा राहिला, तर त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, कारण एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणचा प्रभाव विशेषतः मुस्लिम महिलांमध्ये आहे.
भाजपाच्या सर्व्हेनुसार, 18 वॉर्डपैकी 7 वॉर्डमध्ये मुस्लिम बहुल भाग सुमारे 35 टक्के आहे, जिथे मुस्लिम मतदार विजयासाठी निर्णायक ठरू शकतात. वरिष्ठ नेत्यांच्या मते, या जागा एकनाथ शिंदे यांना देण्यास भाजपाला अडथळा निर्माण होणार नाही.
महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिक अडथळा
महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या युतीत नवाब मलिक अडथळा ठरत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुंबईचं नेतृत्व नवाब मलिकांकडे असून, भाजपाला त्याचा विरोध आहे. जर राष्ट्रवादीत मुंबईचं नेतृत्व नवाब मलिकांच्या ऐवजी इतर कुणाकडे दिलं, तर भाजपने त्यावर कोणताही आक्षेप नोंदवणार नाही.लवकरच महायुतीतील तिसरा महत्त्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादीला समाविष्ट करण्याबाबत चर्चा सुरू होणार आहे. आगामी काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम युतीची रूपरेषा स्पष्ट होईल.