उरण : दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती न देता स्वावलंबनाची संधी देणे ही काळाची गरज आहे. स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक साधने व सक्षम पाठबळ मिळाल्यास दिव्यांग व्यक्ती सन्मानाने उपजीविका करू शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने सहभागी होऊ शकतात. अशा उद्योजकतेला चालना देणारे उपक्रम सामाजिक समतेचा पाया अधिक भक्कम करतात. दिव्यांग व्यक्तींना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर — जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए ) यांचे मनःपूर्वक आभार दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले.
भारतामधील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून ओळखले जाणारे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए ) यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी( सीएस आर ) उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी उद्योजकता व उपजीविका विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आवश्यक व्यवसायोपयोगी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व लाहस प्रतिष्ठा, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीए मल्टीपर्पज हॉल उरण येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमप्रसंगी रविष कुमार सिंग( उपाध्यक्ष, जेएनपीए – आय आर एस ), मनिषा जाधव मॅडम (महाव्यवस्थापिका – प्रशासन व सचिव) यांची प्रमुख उपस्थिती होती. विनय मल्ल-व्यवस्थापक, रवींद्र पाटील जेएनपीए विश्वस्त , यांसह विजय ओझाला ( विश्वस्त- लहास प्रतिष्ठान ), ज्ञानेश्वर भोईर( प्रमुख-लहास प्रतिष्ठान), प्रतीक्षा फर्डे (समन्वयक), दिव्यांग सामाजिक संघटना उरणचे सर्व शिलेदार, संघटनेचे सल्लागार मदन पाटील, तसेच उरण तालुक्यातील लाभार्थी दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात एकूण ४४ व्यवसायोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये २ लॅपटॉप, ११ झेरॉक्स मशीन, २० शिलाई मशीन आणि ११ घरघंटी यांचा समावेश होता. या साहित्यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळून आत्मनिर्भरतेकडे एक ठोस पाऊल टाकण्यास मदत होणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत समावेशक विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी जेएनपीए प्राधिकरण व लाहस प्रतिष्ठान यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी वेळोवेळी मागणीपर पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या दिव्यांग सामाजिक संघटना उरणच्या सर्व शिलेदारांचे विशेष आभार लाभार्थी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले.दिव्यांग व्यक्तींना सक्षम करून त्यांना सन्मानजनक व स्वावलंबी जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.