पुणे : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांच्या वतीने प्रकाशित दोन नवी पुस्तके आणि नवीन वर्षाची दैनंदिनी यांचा प्रकाशन सोहळा रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सेवाभवन, पटवर्धन बाग चौक, एरंडवणे येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सौ. सुहासिनी देशपांडे यांनी अनुवादित केलेले ‘सनातन धर्म’, डॉ. शरद कुलकर्णी लिखित ‘पूर्णत्वाचे प्रवासी’ हे पुस्तक तसेच ‘विवेक शलाका २०२६’ या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.
या सोहळ्याला शिरीष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा अर्बन पतसंस्था आणि राजेंद्र हिरेमठ, अध्यक्ष, जनसेवा सहकारी बँक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्त्या म्हणून विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे यांनी मार्गदर्शन केले.विवेकानंद केंद्राचे प्रकाशन विभागप्रमुख सुधीर जोगळेकर ,विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांताचे संचालक किरण कीर्तने व्यासपीठावर उपस्थित होते. सनातन धर्म हे मूळ पुस्तक भगिनी निवेदिता यांनी लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद सौ. सुहासिनी देशपांडे यांनी केला आहे.'पूर्णत्वाचे प्रवासी' या पुस्तकाचे अंतरंग ललिता नामजोशी यांनी उलगडले..
कार्यक्रमाला सभागृहात प्रा. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. ललिता नामजोशी,सुनीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर जोगळेकर यांनी केले. सूत्रसंचाल नगजानन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेंद्र बोरकर यांनी मानले.
डॉ. निवेदिता भिडे यांनी सनातन धर्म, कुटुंब व्यवस्था आणि समरसता हे परस्परांशी घट्ट जोडलेले विषय असल्याचे स्पष्ट केले. धर्म हा संकुचित नसून तो परिवार, समाज आणि सृष्टीशी आत्मीयतेने जोडलेला जीवनविचार आहे, असे त्यांनी सांगितले. पुस्तकांतील विचार केवळ वाचनापुरते न ठेवता स्वाध्यायातून जीवनात उतरविण्याचा आग्रह त्यांनी धरला. कुटुंबात संवाद, चर्चा आणि एकत्रित उपक्रम वाढले तरच कुटुंब व्यवस्था टिकेल, अन्यथा भवितव्य कठीण होईल, असे त्यांनी नमूद केले. वाढत्या व्यसनाधीनतेला आणि वैचारिक आक्रमणाला सामोरे जाण्यासाठी वाचन संस्कृती बळकट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. समरसता हा रोजच्या आचरणाचा विषय असून तो दैनंदिनीत आणि दैनंदिन जीवनात उतरला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
राजेंद्र हिरेमठ यांनी आपल्या मनोगतात पत्रलेखन आणि विचारमंथनाचे महत्त्व अधोरेखित करत कुटुंबातील संवाद वाढण्यासाठी अशा पुस्तकांचे मोल विशद केले. कुटुंबीयांमध्ये संवाद, चर्चा आणि प्रबोधन घडले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शिरीष देशपांडे यांनी संस्कार घडविणाऱ्या आणि सोप्या भाषेतील अनुवादित पुस्तकांची आजच्या समाजाला गरज असल्याचे नमूद केले. विवेकानंद केंद्राचा प्रकाशन विभाग भारतीय विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.