नाशिक : नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. नाशिकचा हा वारसा जपण्यास आगामी काळात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी हरित कुंभच्या शुभारंभातून वृक्षारोपण व विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत भक्तीचरणदास महाराज, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कुंभमेळा मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आज हरित कुंभचा शुभारंभ झाला असून जवळपास 2 हजार वृक्षांचे रोपण विविध ठिकाणी होणार आहे. अशा 15 ते 20 फुटांची 15 हजार वृक्षांचे रोपण टप्प्याटप्प्यातून करण्यात उपलब्ध झालेल्या जागेत करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षातच ही झाडांना वटवृक्षासारखे स्वरूप येणार असून या कार्यात प्रशासनासह अनेक संस्थाही सहभागी झाल्या आहेत. नाशिक शहराची ओळख आपण सर्वांना जपायची असून वृक्ष वाचली पाहिजेत, वृक्ष संवर्धन झाले पाहिजे या भूमिकेतून नागरिकांचेही भरीव योगदान अपेक्षित असल्याची भावना मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केली.
गोदावरी नदीचे पाणी पवित्र करण्याचा संकल्प सर्व नाशिककरांच्या साक्षीने घेतला आहे. जवळपास 1500 कोटींच्या मलनि:सारण प्रकल्पाच्या माध्यमातून जल शुद्ध करून गोदावरीत प्रवाहित केले जाणार आहे. येत्या वर्षभरातच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर शहरालाही तितकेच धार्मिक महत्व असून या ठिकाणीही 250 कोटींच्या योजनेतून बाराही महिने पाणी उपलब्ध राहील असे नियोजन करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने साकारण्यात येत असलेल्या रिंगरोडमुळे उद्योगांना चालना मिळणार असून औद्योगिकदृष्ट्या नाशिकचा अधिक विकास होणार आहे. शहरातही 700 कोटी निधीतून रस्त्यांची कामे सुरू झाली असून कायमस्वरूपी व्हाइट टॉपिंग सिमेंट रस्ते तयार होणार आहेत. रामकालपथ साकारण्यासाठी विस्थापित करण्यात आलेल्या व्यावसायिकांना पर्यायी जागा व मोबदला देण्यात आलेला आहे. तसेच 63 नागरिकांना पर्यायी निवास प्रशासानाने उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे केवळ नागरिकांच्या सहकार्याच्या भूमिकेतून कुंभमेळा यशस्वी होणारअसल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.यावेळी आमदार राहुल ढिकले व आमदार देवयानी फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कामांचे झाले भूमीपूजन
1. अमृत 2.0 योजनेंतर्गत मलनि:सारण व्यवस्था विकासित करणे- प्रकल्पाची किंमत रू 227 कोटी
2. नाशिक म्युनिसिपल बाँड अंतर्गत मलनि:सारण व्यवस्था विकसित करणे- प्रकल्पाची किंमत रू.225 कोटी
3. कुंभमेळासाठी नाशिक शहरातील 7 रस्ते व 2 पूल विकसित करणे- प्रकल्पाची किंमत रू. 237.66 कोटी
4. हरित कुंभचा शुभारंभ, 15 हजार वृक्षारोपणाचा प्रारंभ
63 विस्थापित झालेल्या रहिवाश्यांना सदनिका वाटप पत्र
रामकाल पथ निर्मितीसाठी 63 विस्थापित झालेल्या रहिवाश्यांना यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते प्राधिनिधिक स्वरूपात सदनिका वाटप पत्र प्रदान करण्यात आहे.
