छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या लोकाभिमुख, पारदर्शक व परिणामकारक उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (१५ डिसेंबर) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी राज्यभर अशाच पद्धतीचे उपक्रम राबवून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले ‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी’, नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी उभारलेले प्रतिसाद केंद्र, तसेच सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महसूलच्या प्रत्येक आदेशावर क्यूआर कोड अशा अभिनव उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी प्रशासनाने पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने काम करावे, असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशनसाठी पाठपुराव्याचे आश्वासन
सध्या जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आले. निधीअभावी अनेक कामे अपूर्ण असल्याने ती तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनाने सक्रिय पाठपुरावा करावा, असे निर्देश देत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केंद्रात काम केल्याचा अनुभव लक्षात घेऊन निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्देश
या बैठकीस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य सचिवांनी प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय योजनांचा आढावा घेत अंमलबजावणीत येणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना योजनांची माहिती स्थानिक भाषेत आणि सोप्या पद्धतीने मिळावी, यावरही त्यांनी भर दिला.
प्रशासनावर जनतेचा विश्वास दृढ
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे, विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करणे—या सर्व बाबींमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.लोकशाही मूल्यांनुसार “प्रशासन जनतेसाठी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे हे कार्य प्रेरणादायी असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.