मुंबई : साताऱ्यात 145 कोटींच्या ड्रग्सप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साताऱ्यातील सावरी गावात असलेल्या प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्ट परिसरात 45 किलो ड्रग्स सापडल्याचा दावा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात सुरक्षेची हमी देण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अपेक्षा व्यक्त केली.
अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शेडचा मालक गोविंद सिंदकर असून शेडची चावी ओंकार दिघे याने घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात ओंकार दिघे याला ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. सातारा पोलिसांना माहिती न देता मुंबई पोलिसांनी कारवाई का केली, असा सवाल उपस्थित करत प्रकरण अधिक गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, प्रकाश शिंदे यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत. “ज्या ठिकाणी ड्रग्स सापडले, ती जागा माझ्या मालकीच्या ठिकाणापासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या जागेशी या घटनेचा कोणताही संबंध नाही. ती जागा रिसॉर्ट नसून, सहा महिन्यांपूर्वी रणजीत शिंदे यांना दिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.“हे आरोप पूर्णपणे खोटे असून राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई झाली पाहिजे,” असेही प्रकाश शिंदे म्हणाले. साताऱ्याच्या एसपींशी आपला कोणताही संपर्क नसल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस तपासातून सत्य समोर येईल, असे शिंदे यांनी सांगितले.