मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा असावा. उमेदवार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या ०५४/२०२५ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण असावा. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्यासाठी बार्टीच्या https://forms.gle/nkVisRqmndp1qpAM9 या लिंकवर फॉर्म आणि आवश्यक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे. एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केल्यास संबंधित विद्यार्थ्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
उमेदवाराने ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त अर्जाची स्व-साक्षांकित प्रत बार्टी, पुणे कार्यालयास २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करावी. अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) 28/ कीन्स गार्डन, कॅम्प पुणे 411001 असून अधिक माहितीसाठी 020-26333330/26333339 येथे संपर्क करावा. अर्जाच्या लिफाफ्यावर ‘एम.पी.एस. सी अभियांत्रिकी 2025 मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य असे नमूद करण्याचे आवाहन बार्टी कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे.
