सातारा : प्राणांची बाजी लावून देशाच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या प्रसंगी हौताम्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. सातारा जिल्ह्यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावर्षी महाराष्ट्र राज्याने 40 कोटी संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत 50 कोटी संकलन करुन संपूर्ण देशात आघाडी घेतली आहे. तर सातारा जिल्ह्यानेही 1 कोटी 59 लाख उद्दिष्टाच्या तुलनेत 1 कोटी 69 लाख सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित करुन 107 टक्के उद्दिष्टपुर्ती केली आहे. पुढील वर्षी ती याच्याही दुप्पट केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिली. उद्दिष्टापेक्षा जास्त संकलन केल्याबद्दल राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी श्री. पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. हांगे यांचा माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, स्क्वार्डन लिडर शमी सनधीर यांची उपस्थिती होती.
प्रत्येक युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जवानांनी अतुलनीय शौय गाजवले आहे, बलिदान दिले आहे. याची जाणीव ठेवून सैनिकांच्या कल्याणासाठी 7 डिसेंबर 1950 पासून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन उपक्रम राबविण्यात येतो. या वर्षी 76 वा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमामध्ये करण्यात आला.
सातारा हा शुरविरांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून सर्वात मोठ्या संख्येने सैनिक भरती होतात. सशस्त्र दलात देशाची सेवा बजावतांना अनेकांना हौतात्म्य प्राप्त होते, अनेकांना दिव्यांगत्व येते. त्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनासह संपूर्ण समाजाचीही आहे. याची जाणीव ठेवून सर्व जिल्हावासियांनी या उपक्रमासाठी सढळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या वर्षी करण्यात आलेली 107 टक्क्यांची उद्दिष्टपुर्ती पुढील 207 टक्क्यांपर्यंत नेऊ अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमामध्ये शहीदांच्या कुटुंबीयांना, दिव्यांगत्व आलेल्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष सैनिकांसाठी असणाऱ्या विविध योजनांतर्गत धनादेशांचे वाटप, विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये छत्तीसगडमधील नक्षल विरोधी मोहिमेत शहीद झालेले बावडा ता. खंडाळा येथील अमर पवार यांच्या वीर पत्नी कोमल अमर पवार, वीर माता सुरेखा पवार, वीर पिता शामराव पवार यांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 1 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. रिवड ता. कराड येथील सैनिक सागर हणमंत इंगवले यांना अरुणाचल प्रदेशातील ऑपरेशन स्नो लिओपार्ड अंतर्गत दिव्यांग प्राप्त झाले आहे त्यांच्या पत्नी निशा सागर इंगवले यांना 60 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
घरातघर (गांजे) ता. जावली येथील शहीद पोलीस नवनाथ सुर्वे यांच्या वीर पत्नी शालन नवनाथ सुर्वे यांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी इयत्ता 10 व 12 वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडुंचाही सन्मान करण्यात आला. स्वयंरोजगार, परदेशी शिक्षण, सदनिका खरेदी, विविध फिजीकल कॅज्युलटी आदी प्रकरणामधीलही धनादेशांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांचा प्राथमिक स्वरुपात सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.