मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदावरून मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्याचा पक्षाचा विचार असून, त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यमंत्रीपदावर आमदार सना मलिक यांना संधी मिळण्याची जोरदार चर्चा आहे.दरम्यान, माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली असून, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्यांची आमदारकी अद्याप धोक्यात असल्याने मंत्रीपद रिक्तच मानले जात आहे.
मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत चुरस
क्रीडामंत्रीपदाच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग सुरू आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांच्यासह आमदार प्रकाश सोळंके आणि सुनिल शेळके मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.मात्र, सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींशी संबंधित आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मराठवाड्यातील मराठा समाजात संभाव्य नाराजी लक्षात घेता, त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंद्रनील नाईकांना कॅबिनेट मंत्रीपदाची शक्यता
या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाचा ‘प्लॅन बी’ समोर आला आहे. विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्याचा गंभीर विचार सुरू आहे. माणिकराव कोकाटेंची खाती इंद्रनील नाईकांकडे सोपवली जाऊ शकतात.सध्या इंद्रनील नाईक उद्योग, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशी सहा महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. त्यांच्या माध्यमातून बंजारा समाजातील तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे बोलले जात आहे. तसेच विदर्भाला कॅबिनेट मंत्रिपद देत जनाधार वाढवण्याची पक्षाची रणनीती आहे.
सना मलिकांना राज्यमंत्रीपद?
इंद्रनील नाईक कॅबिनेट मंत्री झाल्यास त्यांचे राज्यमंत्रीपद रिक्त होणार आहे. या पदावर मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाच्या आमदार सना मलिक यांना संधी देण्याचा विचार पक्षात सुरू आहे. सना मलिक यांच्या रूपाने मुस्लिम, महिला आणि तरुण या तीन घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्र्यांचा खांदेपालट?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांचा खांदेपालट आणि शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.