पुणे : पूर्व पुण्यातील प्रभावी, अभ्यासू आणि संघटनात्मक ताकद म्हणून ओळख असलेले सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पूर्व पुण्यात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील ‘टीम देवेंद्र’ अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पुण्यात सुमारे ३००० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले होते. पुणे हे केवळ सांस्कृतिक शहर नसून टेक्नोसेवी आणि जागतिक स्तरावर कामगिरी करणारे शहर म्हणून पुढे जाण्याची क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. त्यांचा ‘भविष्यातील पुणे’ हा संकल्प साकारण्यासाठी व्हिजन असलेले, अभ्यासू आणि जमिनीवर काम करणारे नेते आवश्यक आहेत. त्या दृष्टीने सुरेंद्र पठारे हे भाजपसाठी महत्त्वाची ताकद ठरू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांचा मोलाचा वाटा होता. प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती. नियोजनबद्ध प्रचार, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची क्षमता यामुळे त्यांची संघटनात्मक ताकद त्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतरच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्या कामाकडे वेधले गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या, आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सुरेंद्र पठारे यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे, तर शैक्षणिकदृष्ट्याही भक्कम व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, त्या काळात ते गोल्ड मेडलिस्ट होते. लोहगाव, वाघोली, खराडी, चंदननगर यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. यापूर्वी त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्याला पूर्व पुण्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
एकूणच, सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे पूर्व पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.